पुणे, कोकणात मुसळधार बरसणार, राज्यातील या भागांत ६ जुलैपासून पाऊस सक्रीय
Monsoon Update: महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे.

Monsoon Update: राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. पुणे शहरात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. या पावसाचा जोर गुरुवारी असणार आहे. पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, नाशिक या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भात अजूनही पाऊस सक्रीय झाला नाही. परंतु ६ जुलैपासून या भागांत पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
६ जुलैनंतर पाऊस सक्रीय
हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे. तसेच विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता. यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
2 Jul, IMD मॉडेल नुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ होण्याची शक्यता.तसेच विदर्भ व उ.मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता.यामुळे या भागात पावसाची आकडेवारी सुधारेल.ही गतिविधी पुढेही सुरू राहण्याची शक्यता. कृपया IMD अलर्ट पहा. pic.twitter.com/z3ZeGMxRkH
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 2, 2025
पुण्यात रात्रभर पाऊस
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु बुधवारी रात्री चांगला पाऊस झाला. पुणे शहरांसह घटमाथ्यावर पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली. घटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. रात्री 12 पासून 6451 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
पुणेकरांनो पाणी उकळून प्या
गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्र आणि डोंगरमाथा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याबरोबरच माती, गाळ धरणात येत आहे. धरणाच्या पाण्यात गढूळपणा वाढल्याने नागरिकांकडून खराब पाणी येत असलेल्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी महापालिका आवश्यक काळजी घेत असून नागरिकांनीही पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नाशिक जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा संततदार पाऊस सुरू झाल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला आहे. गंगापूर धरणातून 2133 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाळ्याची चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, सध्या धरण 66.49 टक्के भरले आहे.
