संशयाने टोक गाठले, विवाहित प्रियकराचा प्रेयसीवर चॉपर हल्ला, पिंपरी-चिंचवड हादरले
हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातील संशयातून एका १८ वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने चॉपरने जीवघेणा हल्ला केला. पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या या थरारक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रेम आणि संशय यांच्या नाजूक धाग्यात गुंफलेल्या एका लव्ह स्टोरीचा हिंजवडी परिसरात अत्यंत रक्तरंजित शेवट झाला. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या संशयामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एका प्रियकराने मित्रांच्या मदतीने १८ वर्षीय प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी परिसरात असलेल्या या चॉपर हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही थरारक घटना हिंजवडी परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ साखरे वस्तीजवळ वर्दळीच्या ठिकाणी घडली. १८ वर्षीय तरुणी या ठिकाणी आली असता मुख्य आरोपी योगेश भालेराव आणि त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तरुणीवर हल्ला केला. यावेळी आरोपींनी तिच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. ज्यामुळे ती तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
प्रकृती चिंताजनक
या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. यानंतर काही नागरिकांनी जखमी तरुणीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाकडून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोललं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी योगेश भालेराव याचे १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. महत्त्वाचे म्हणजे योगेश विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहते. योगेशला आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध जुळल्याचा तीव्र संशय होता. याच संशयाच्या भावनेतून योगेशने प्रेमाचे नाते विसरून सूड घेण्याचा कट रचला. या कटात त्याने आपला साथीदार प्रेम वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाला सोबत घेतले. नियोजित ठिकाणी तरुणी दिसताच त्यांनी तिच्यावर हल्ला केला.
संशयाचे रूपांतर क्रूर हल्ल्यात
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात हल्ल्यामागील कारण स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी योगेश भालेराव याचे १८ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे योगेश भालेराव हा विवाहित असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहते. या प्रेमसंबंधात योगेशला आपली प्रेयसीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध जुळल्याचा तीव्र संशय होता. याच संशयाचे रूपांतर क्रूर हल्ल्यात झाले. त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन तरुणीवर चॉपरने हल्ला केल्याचे उघड झाले आहे.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी मुख्य आरोपी प्रियकर योगेश भालेराव, त्याचा साथीदार प्रेम वाघमारे आणि या कटात सामील असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवडसारख्या आयटी हबजवळ झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातील संशयातून होणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हिंजवडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.
