उद्धव ठाकरे यांनी विकास कामात कसा अडथळा आणला?; देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतच मांडला लेखाजोखा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सुशासन महोत्सव या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली. समृद्धी महामार्गाचे काम रोखण्याचं काम कशाप्रकारे करण्यात आलं याबाबत फडणवीसांनी आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी विकास कामात कसा अडथळा आणला?; देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतच मांडला लेखाजोखा
| Updated on: Feb 09, 2024 | 9:30 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सुशासन महोत्सवात हजेरी लावली. यावेळी या कार्यक्रमात बोलताना त्यांना सुशासन म्हणजे काय आणि केंद्र सरकार कशा प्रकारे यासाठी काम करत आहे हे त्यांनी पटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशासन सारखेच वातावरण तयार केल्याचं ते म्हणाले. देशाचं सरकार असो किंवा राज्याचं सुशासनचे वेगवेगळे मॉडेल आपल्याला बघायला मिळत असल्याचं ते पुढे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग बनवल्यावर १४ जिल्ह्यांना फायदा होईल. त्यांचा आर्थिक बदल होईल. त्या शहरात बदल होईल. मागास विभाग पुढे येईल. पण लोकांना विश्वास वाटत नव्हता. आम्ही त्याचं मॉडेल तयार केलं. मला त्यावेळी काही मोठ्या नेत्यांनी सांगितलं कुठे ग्रीन फिल्ड कशाला करता. बाजूचीच जमीन घेऊन आहे तो रस्ता मोठा करा, असा सल्ला मला अनेकांनी दिली. मी त्यांना अर्थकारण सांगितलं. तिथल्या जमिनी महागड्या आहेत. या जमिनी संपादित करणंही कठिण आहे. तिथले लोक व्यवसाय करतात. ते भूसंपादन होऊ देणार नाही. चार पैसे जास्त मिळतील, पण मी ग्रीन फिल्ड तयार केलं तर लोक मला जमीन देतील. चांगले पैसे दिले तर नाकारणार नाही.’

‘शरद पवारांनी समृद्धीला केला होता विरोध’

शरद पवार यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन या समृद्धी प्रकल्पाला विरोध केला होता. उद्धव ठाकरे यांनी एका गावात जाऊन सभा घेतली. तुमची जमीन हिसकावण्यासाठी लोक येत आहेत. तुम्ही जमिनी देऊ नका असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आम्ही म्हणालो आम्ही जमिनीचे चारपट पैसे देत आहोत. आणि कन्सेट ऑर्डर असेल तर आम्ही पाचपट पैसे देऊ. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ज्या गावात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्या गावात संपूर्ण दिवसात एका गावातील जमीन आम्ही कन्सेंट अॅवार्डमध्ये घेतली. त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांच्या खात्यात पैसेही टाकले. आता आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे सहकारी मंत्री होते. त्यांना मी गावात पाठवून सह्या घ्यायला सांगितलं. त्यांनी सह्या घेतल्या. त्यामुळे लोकांचा दृष्टीकोण बदलला. हे सर्वात वेगवान झालेलं भूसंपादन होतं. ७०० किलोमीटरची पूर्ण जमीन ९ महिन्यात घेतली आणि साडे तीन वर्षात रोड तयार केला. असं ही फडणवीस म्हणाले.

‘पारदर्शिकता दिली तर लोक विश्वास ठेवतात’

‘आज आमच्या प्रकल्पाला विरोध का होतो. कारण सरकारबद्दलचा विश्वास नाही. लोकांच्या मनात एक ठसवलं आहे की, सरकार तुमची जमीन घेईल. तुम्हाला पैसे देणार नाही. आणि प्रकल्पही होणार नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास नाही. ते योग्यही आहे. कारण आधीच्या काळी तसं घडलेलंही आहे. त्यामुळे लोकांना वाटतं आमच्यासोबत फसवणूक होत आहे. जेव्हा तुम्ही प्रकल्प करता आणि लोकांशी संवाद साधला पाहिजे. अनेक प्रकल्पात प्रकल्पबाधित होते. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना सांगितलं यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पारदर्शिकता. तुम्ही लोकांसमोर पारदर्शिकता दिली तर लोक विश्वास ठेवतात.’

‘आम्हाला कोकणात रिफायनरी करायची होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी मोठा विरोध केला. त्यामुळे प्रकल्प झाला नाही. पण या विरोधानंतरही दहा हजार लोकांनी पत्र दिलं की आम्ही जमीन देतो. नंतर आमचं सरकार गेलं. त्यांचं सरकार आलं आणि त्यांनी प्रकल्प रोखला. त्यामुळे मोठं नुकसान झालं. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी ते घेऊन जात आहोत.’ असं ही देवेंद्र फडणवीस म्हणाले.