IMD Weather Update : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे, आयएमडीचा मोठा इशारा
महाराष्ट्रात पावसानं धुमाकुळ घातला आहे, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. दरम्यान पावसाचा धोका अजूनही कमी झाला नसून, उद्या देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरूच असून, अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा मोठा परिणाम हा मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर झाला असून, लोकलच वेळापत्रक कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे, याचा मोठा फटका हा चाकरमाण्यांना बसला आहे.
दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस या सारख्या पिकांना या पावसाचा प्रचंड फटका बसला असून, शेतात पाणी साचल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान धोका अजूनही टळलेला नाहीये, पुढील 24 तासांमध्ये हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, आयएमडीनं वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा
दरम्यान भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये समुद्रात 3.5 ते 4.3 मीटर एवढ्या उंच लाट उसळणार असल्याचा अंदाज आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण नदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
