पालिकेत भाजपचे किती नगरसेवक निवडून येणार ? ‘हा’ आकडा सांगून ठाकरे गटाच्या नेत्याने उडविली खिल्ली
भरत गोगावले हे चुकीचे गट नेते बनले असा सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय आला आहे. त्यावर आता अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात ते पाहायचे आहे. अध्यक्ष वकील आहेत. पण, त्यांना स्पोर्टिव्ह कोण पुरवते हे आम्हाला माहित आहे असा टोला लगावला.
मुंबई : भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचे 151 नगरसेवक निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकांचे ८२ इतके संख्याबळ असून हा आकडा 151 इतका करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र, यावर बोलताना ठाकरे गटाच्या नेत्याने भाजप आणि शिंदे गटाला किती जागा मिळतील याचा थेट आकडा सांगून त्यांची खिल्ली उडविली. तसेच यावेळी बोलताना या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय. महाविकास आघाडीतील नेत्यांनी परस्परांचा आदर राखावा, एकमेकांवर चिखलफेक करू नये असे आवाहन त्यांनी केलंय.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते वेगवेगळे वक्तव्य करतात. आमचे प्रश्न आम्ही प्रसार माध्यमासमोर मांडतो. पण यावेळी तारतम्य बाळगायला पाहिजे. प्रसारमाध्यम आमचे प्रश्न सोडवत नाही. यासाठी आपणच अभ्यास करून ते मुद्दे बैठकीत मांडले पाहिजे अस माझे मत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितले.
राजकारणात काही गोष्टी दाखवायच्या नसतात. आमचे मित्र पक्ष अभ्यास करत असतात तसाच आम्ही ही अभ्यास करत आहोत. पण, एकमेकांनी परस्परांचा आदर राखावा. एकमेकांवर चिखलफेक करू नये असे आवाहन त्यांनी केले.
वंचित आणि शिवसेनेची युती, अन्य पक्ष विचार करतील
शिवेसेनेबाबत वंचित बघून आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड यांच्यासोबत आघाडी केली आहे. त्याचसोबत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्षही आमच्यासोबत आहेत. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वंचितची आघाडी नाही. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलणी सुरु आहे असेही त्यांनी सांगितले.
फडणवीस शब्द छळ करतात
देवेंद्र फडणवीस यांना या बोटावरची थुंकी त्या बोटावर करता येते. ते शब्द छळ फारच करतात. विरोधी पक्षाच्या कामांना त्यांनी स्टे दिला. मुंबई महापालिकेच्या डिपॉजिटवर त्यांचा डोळा आहे. त्यांनी कितीही वल्गना केल्या तरी महापालिकेत भाजपचे केवळ 28 नगरसेवक निवडून येतील असे ते म्हणाले.
अध्यक्ष वकील आहेत. पण, त्यांना स्पोर्टिव्ह कुणाचे?
भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये शिंदे गट जेमतेम 7 जागा जिंकतील असा गोपनीय रिपोर्ट आला. त्यामुळे भाजप निवडणुकीत शिंदे गटाला बाजूला करून लढतील. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा उपयोग करून घेतील. मात्र, विधानसभेला शिंदे गटाला बाहेर करतील. भरत गोगावले हे चुकीचे गट नेते बनले असा सर्वोच्च न्यायालयाचाच निर्णय आला आहे. त्यावर आता अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात ते पाहायचे आहे. अध्यक्ष वकील आहेत. पण, त्यांना स्पोर्टिव्ह कोण पुरवते हे आम्हाला माहित आहे असा टोलाही त्यांनी लगावला.