
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच नेते प्रचारात व्यस्त आहेत. प्रत्येक महानगर पालिकेचे समीकरण वेगळे आहे, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची युती झालेली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे हे दररोज वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे, भाजप आणि काँग्रेस अशा सर्व पक्षांना मोठा धक्का दिला आहे. नेरूळ विभागातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पक्ष प्रवेशाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ विभागातील उबाठा गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी तसेच मुंबई शहरातील धारावी विभागातील राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नवी मुंबईतील भाजप उपाध्यक्ष राजू तिकोने, नेरूळचे महामंत्री शशिकांत मोरे, वॉर्ड अध्यक्ष भरत म्हात्रे, नेरूळ भाजपा उपाध्यक्ष सोनपा घोलप, उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख प्रतापसिंह विसाळ, माजी विभागप्रमुख सुनील हुंडारे, मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नायकडे, युवा सचिव ऋषिकेश भुजबळ, तालुका सचिव अक्षय शिरगावकर, वॉर्ड अध्यक्ष सुजित भोर, सागर जोगाडिया, आशिष कदम, गुरुदास गर्जे, अमित पवार आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
📍 ठाणे |#नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील #नेरूळ विभागातील उबाठा गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी तसेच #मुंबई शहरातील #धारावी विभागातील राष्ट्रीय काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.… pic.twitter.com/jz1rtuxQt1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2026
त्याचबरोबर धारावी काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शिवलिंग व्हटकर, मुंबई युवक काँग्रेसचे महासचिव विकी व्हटकर, धारावी विधानसभा उपमुख्य समन्वयक विनायक पोळ, ब्लॉक अध्यक्ष सुरेश मोगला, जयेश मुदलीयार, रोशन शेख, महेश तावरे आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर मनसेच्या विभाग सचिव सविता बोबडे, दीपक नारायणे, राजेश कुमार पारयार, धनाशेखर पारयार, सुरेश बेडगिरी यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशावेळी खासदार नरेश म्हस्के आणि माजी नगरसेवक नामदेव भगत, काशीनाथ पवार तसेच शिवसेनेचे धारावी आणि नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.