इंदुरीकरांकडून मुलीच्या साखरपुड्यावर पैशांची उधळपट्टी, पण महाराजांनी तो शब्द पाळला, नवीन प्रथेचं तुम्हालाही वाटेल कौतुक
काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा मोठा थाटात पार पडला, मात्र या साखरपुड्यावर झालेल्या खर्चामुळे आता इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

समाज प्रभोधनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार असलेल्या निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला, संगमनेरमध्ये मोठ्या थाटा-माटात इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा झाला. साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दरम्यान या साखरपुड्यावर झालेल्या खर्चामुळे पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदुरीकर हे चांगलेच चर्चेमध्ये आले आहेत. या साखरपुड्यात झालेल्या खर्चामुळे त्यांच्यावर टीका देखील होत आहे. इंदुरीकर महाराज हे नेहमी आपल्या किर्तनात सांगत असतात की लग्न साधेपणानं करा, लग्ना सारख्या कार्यक्रमावर जास्त खर्च करू नका, मग इंदुरीकर महाराज यांनी आपल्या लेकीचा साखरपुडा एवढ्या थाटात का केला? एवढी पैशांची उधळपट्टी का केली? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
मात्र जरी इंदुरीकर महाराज यांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटात केला असला तरी त्यांनी आपल्या किर्तनातील एक शब्द नक्की पाळला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून एक नवीन प्रथा सुरू केली आहे. ते किर्तनात नेहमी सांगतात की लग्नामध्ये सत्कार समारंभ ठेवूच नका, आणि त्यांनी देखील आपल्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात कोणाचाही सत्कार केला नाही. यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा देखील केला आहे.
अनेक ठिकाणी लग्न व इतर कार्यक्रमात प्रथा असते काही विशिष्ट लोकांचा सत्कार कारायचा आणि तिथे आलेल्या इतर लोकांनी त्यांच्याकडे पहायचं मात्र आज या कार्यक्रमापासून मी या प्रथेत बदल करत आहे. लोकांनी मना नाव ठेवलं तरी हरकत नाही, कारण गेले तीस वर्ष लोक मला नावच ठेवत आले आहेत. माझ्या मुलीच्या साखरपुड्यात मी कोणाचाही सत्कार केला नाही, सर्व जण समान. त्याऐवजी मी इथे उपस्थित सर्वांना विठ्ठलाची एक मूर्ती भेट म्हणून दिली आहे. ही मूर्ती त्यांच्या देवघरात राहील आणि तिची रोज पूजा केली जाईल असं यावेळी इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान इंदुरीकर महाराजांनी घेतलेल्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
