उद्धव ठाकरेंना मनसेचा आणखी एक सर्वात मोठा झटका? मनसे आणि भाजपची युती होणार? बाळा नांदगावकर यांच्या सूचक विधानाने खळबळ
बाळा नांदगावकर यांनी नुकताच केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी थेट मुंबईमध्ये काय होऊ शकतं हे मी आता सांगू शकत नाही असे म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच एकत्र आली होती. त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी आमची युती कायम राहिल असं वारंवार सांगितलं होतं. महापालिका निवडणुकीत दोन्ही नेत्यांना फारसं यश आलं नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरेंसोबतची युती कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. या घटनेला आठ दिवसही होत नाही तोच मनसेने कल्याण डोंबिलीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांना पहिला झटका दिला आहे. त्या झटक्यातून ठाकरे गट सावरत नाही तोच मुंबईतही मनसेकडून ठाकरे गटाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तसं सूचक विधान करून ठाकरे गटाची झोपच उडवून दिली आहे. त्यामुळे येत्या चार पाच दिवसात काय राजकीय गणितं तयार होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
बाळा नांदगावकर यांनी, स्थानिक पातळीवर कल्याण डोंबिवलीचा निर्णय घेण्यात आला आहे. कुठे कोणते निर्णय घ्यायचे यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. मुंबईमध्ये काय होऊ शकतं हे मी आता सांगू शकत नाही. कारण स्थानिक पातळीवर कुठे काही होतं तुम्ही चंद्रपूरला बघा काय झालं… कोकणात बघा काय झालं… असे सुचक विधान केले आहे. पुढे ते म्हणाले की, लकी ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं त्यावर पक्ष कारवाई करू शकतो त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले आहेत.पुढची प्रक्रिया सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांची गट नोंदणी सुरू झाली आहे. आज मनसेचे ६ नगरसेवक नवी मुंबईतील बेलापूरच्या कोकण भवनात गट नोंदणीसाठी गेले आहेत .मुंबई महापालिकेत मनसेच सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेचे गट नेते यशवंत किल्लेदार यांच्यासोबत ५ नगरसेवक मिनी बस मधून नवी मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावक, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत हे वरिष्ठ नेते सोबत असल्याचे चित्र आहे.
अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची मागणी
मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागा जिंकलेल्या भाजपाने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे. मात्र २१ नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून महापौर पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे ठेवण्यात आला असून, पहिल्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर असावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
