‘पाऊस पडत होता त्यामुळे गन पावडर सापडली नसावी’, अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात गृह राज्यमंत्र्यांचं तर्कट
एनकाउंटर झालं तेव्हा पाऊस पडत होता. त्यामुळे गन पावडर सापडली नसावी. या गोष्टीसाठी वेळ मिळाला नसेल, असा दावा योगेश कदम यांनी अक्षय शिंदे याच्या एनकाउंटर प्रकरणात केला आहे.

बदलापुरातील एका नामांकीत शाळेत चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. पोलिसांसाठी हा मोठा धक्का आहे. यावरून आता विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, विरोधकांना प्रत्युत्तर देताना या प्रकरणात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले योगेश कदम?
पोलिसांवर अक्षय शिंदे याने फायरिंग केली, त्यामुळे त्यांना जबाबात फायरिंग करावी लागली. अतिशय घृणास्पद कृत्य या व्यक्तीने केलं, डिफेंसमध्ये जर पोलिसांनी असं कृत्य केलं असेल तर यात गैर आहे असं वाटत नाही. एन्काउंटर झालं तेव्हा पाऊस पडत होता. त्यामुळे गन पावडर सापडली नसावी. या गोष्टीसाठी वेळ मिळाला नसेल.
शेवटी ऊच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावं लागेलच. परंतु अर्थातच हायकोर्ट ही अंतिम अथाॅरिटी नाही, पोलिसांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्या म्हणणारे आत्ता अक्षय शिंदेंची बाजू का घेत आहेत? संजय राऊत यांना छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असा टोला यावेळी योगेश कदम यांनी लगावला आहे.
दरम्यान भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळालं नाही म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते अचानक आपल्या मुळगावी दरे येथे गेले होते. त्यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरे गावात गेले म्हणजे नाराज असं समजनं चुकीचं आहे. ज्यांची इडीची चौकशी सुरू आहे, त्या संजय राऊत यांनी वल्गना करू नये. संजय राऊत यांची किव येते २० आमदारांचा त्यांचा दावा फेक नरेटिव्ह आहे. राज्यात वाढत असलेली बांग्लादेशी नागरिकांची संख्या चिंतेचा विषय आहे. 2024 मध्ये 650 बांग्लादेशींना अटक करण्यात आली आहे. प्रत्येक सरकार माईग्रेशन थांबण्याचा प्रयत्न करत आहे, असं योगेश कदम यांनी म्हटलं आहे.