
भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गौरी गर्जे यांची आई आणि वडील यांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता गौरी यांचे मामा ज्ञानेश्वर गर्जे यांनीही अनंत गर्जे यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.
गौरी यांचे मामा ज्ञानेश्वर गर्जे यांनी म्हटले की, मुलीच्या वडिलांना सुसाईडचं कारण सुरुवातीला औषधाच कारण सांगितलं, नंतर माझ्यासमोर डेड बॉडी आहे असं आईला सांगितलं. एक तर हा सुशिक्षित आहे, पंकजा ताईंचा पीए आहे. त्याला हे माहिती असावं की फाशी घेतल्यानंतर ऑन स्पॉट पहिल्यांदा पोलीस डिपार्टमेंट बोलावून पंचनामा केला जातो आणि त्यानंतर जे काय असेल ती कारवाई करून आणि हॉस्पिटलला नेलं जातं. फाशी घेतली असती तर त्याच्याकडे फोटो पाहिजे होते दुसरी गोष्ट आमचा सरळ सरळ दावा आहे की त्यांनी भांडण केलं आणि भांडणामध्ये तिचा गळा दाबलेला असावा.
आरोपी खोटे पुरावे गोळा करत आहेत. ही आत्महत्या नसून हत्या आहे, राजकीय दबावापोटी आमच्या कुटुंबावर कोणीही दबाव टाकायचा प्रयत्न करू नये. सीबीआय एसआयटी मार्फत चौकशी केली जावी. आई-वडिलांनी सामंजस्याची भूमिका घेतली. गौरी आत्महत्या करणारी नव्हती, ती इतरांना वाचवणारी डॉक्टर होती. ही हत्या आहे. पंकजाताई मुंडे यांना माझं सांगणं आहे की तुमचा पीए आहे म्हणून त्याला दडपवू लपवू नका. गोपीनाथ मुंडे साहेबांना देव्हाऱ्यात पुजतो. तुम्हीही आम्हाला आपलं माना आणि या लेकीला न्याय मिळवून द्या..
पुढे बोलताना मामा म्हणाले की, अंत्यविधी करताना डेट बॉडीची विटंबना केली. चार तास त्रास दिला. पोलीस त्यांच्या बाजूने होते. त्या लोकांनी चुकीची वागणूक दिली. जिवंतपणी आणि मृत्यू झाल्यानंतरही त्रास दिला. तपासावर आम्ही समाधानी नाहीत. पंकजाताई साहेबांनी क्लियर कट सांगावं की माझा पीए असला तरी याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. पंकजाताईंनी अनंत गर्जे ला जर मानसपुत्र मानलं असेल तर त्यांची ही मानस सून होईल. स्वतःची सून स्वतःची मुलगी समजून तुम्ही तो निर्णय घ्यावा. पीए येतील जातील भरपूर होतील. आमच्या लेकीला कधी न्याय मिळेल. तुम्ही हे प्रकरण दाबून ठेवू नये, जर दाबून ठेवलं तर अशा कित्येक लेकींचे बळी जातील.
ही आत्महत्या नसून हत्या आहे, स्वत:हून सांगतोय अनंत गर्जे की सुसाईड केली. त्यानंतर सांगत आहे की फाशी घेतली म्हणजे तो जे सांगेल ती पूर्व दिशा का? ही हत्या आहे आणि याला अनंत आत्महत्येचा स्वरूप देत आहे. सरळ सरळ दोघांच्या वादामध्ये जर आत्महत्या केली असती तर गळ्याच्या भोवती वळ दिसले असते. तिच्या छातीवर अंगावर डोक्यावर मार दिसला नसता. तिला मारहाण केली आणि गळा वगैरे दाबला असावा.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी न्याय द्यावा. फक्त अनंत गरजेला अटक आहे, शितल गर्जेला अटक नाही. अनंतच्या भावाला अटक केलेली नाही. या तिघांनी मिळून गौरीचा गळा आवळून हत्या केली आहे. अनंत गर्जे पॉलिटिकल पावर सांगून सारखा टॉर्चर करत होता. मी काही चालू देणार नाही असं सांगत होता. त्या अनुषंगाने ती गप्प बसली. आई वडील गरीब आहेत म्हणून तिने सहन केलं असंही मामांनी म्हटलं आहे.