दुसरा मोबाईल आणि डोक्यावर खुणा… डॉक्टर गौरीच्या आईचे अनंत गर्जेला अडचणीत आणणारे दोन सवाल; ‘या’ दोन लोकांची घेतली नावे
Gauri Garje Death Case : मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आता गौरी यांच्या आईने अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. आज गौरी गर्जे यांची आई अलकनंदा पालवे यांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दोन लोकांची नावे घेत दोन मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अलकनंदा पालवेंचा अनंत गर्जेंसह दोघांवर आरोप
अलकनंदा पालवे यांनी म्हटले की, मला संध्याकाळी सात वाजता फोन आला, समोरून सांगण्यात आलं की, गौरी गेली तिने फाशी घेतली. माझा आरोप आहे की ती आत्महत्या नसून हत्या आहे. शितल गर्जे, अनंत गर्जे आणि अजय गर्जे यांनी तिची हत्या केली. हत्या करून हे पळून गेले तिथे थांबले नाहीत. छळ करत त्या तिघांनी माझ्या मुलीची हत्या केली. तिघांचीही व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे फक्त अनंतलाच अटक का केली. बाकीच्या दोघांनाही अटक करा.
आईने उपस्थित केले गंभीर प्रश्न
पुढे बोलताना अलकनंदा पालवे यांनी म्हटले की, तिचा मृतदेह पाहिल्यानंतर छातीला आणि डोक्याला मार होता. आत्महत्या केल्यानंतर गळ्याला वन असू शकतात मात्र डोक्याला आणि छातीला व्रण आले कुठून? अनंतचा एकच मोबाईल जप्त केला आहे दुसरा मोबाईल जप्त केलेला नाही? हे दोन प्रश्न उपस्थित करत त्यांनी एसआयटी मार्फत या घटनेचा तपास व्हायला हवा. बाकीच्या कोणत्याच तपासावर माझा विश्वास नाही असं विधान केले आहे.
आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी
पुढे बोलताना अलकनंदा पालवे यांनी म्हटले की, या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. एवढं शिक्षण मी माझ्या मुलीला दिलं. कशातच कमी माझी मुलगी नव्हती.अनंत खूप मारतो अशी तक्रार देखील तिने केली होती. तो मला कधीच कॉल करत नव्हता भांडण झाल्यानंतरच मला कॉल करत होता. आम्ही गेलो तेव्हा आमची मुलगी पोस्टमार्टम रूम मध्ये होती. पंचनामा न करता डायरेक्ट तिला पोस्टमार्टम रूम मध्ये नेलं. त्याच्या बहिणीने भावाने आणि अनंतने मिळून माझ्या मुलीला मारलं.
वडिलांचाही गंभीर आरोपर
गौरी गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केला की, गौरीने गळफास घेतला असता तर तिच्या गळ्यावर तशा खुणा असत्या. तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा माझा दावा आहे. तपास अधिकारी असं काही नाही असं म्हणाले पण आम्ही डोळ्यांनी ते पाहिलं आहे. त्या खुणा कशा आला असा आमचा सवाल आहे. ती आत्महत्या करू शकत नाही, ती खूप स्ट्राँग होती. नातेवाईक यायच्या आधी पंचनामा का करण्यात आला? तुम्ही तुमच्या बहिणीला फोन का केले? तुम्ही यात दोषी नाहीत तर फरार का झालेत याचं उत्तर द्यावं असंही गौरी यांच्या वडिलांनी म्हटले आहे.
