Gauri Garje Case : माझ्या मुलीची आत्महत्या नाही, तिला मारण्यात आलं… वडिलांचा सर्वात मोठा आरोप
Gauri Garje : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे. आज गौरी गर्जे यांच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे.

पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गौरी गर्जे यांच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही तिला मारण्यात आलं आहे असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तिच्या डोक्याला मार लागलेला होता…
गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी याआधीही केली होती. आज या प्रकरणावर बोलताना गौरी गर्जे यांच्या वडिलांनी आरोप केला की, गौरीने गळफास घेतला असता तर तिच्या गळ्यावर तशा खुणा असत्या. तिच्या छातीवर मारहाणीच्या खुणा होत्या, तिच्या डोक्याला मार लागलेला होता. मारहाणीत तिचा मृत्यू झाला असा माझा दावा आहे. तपास अधिकारी असं काही नाही असं म्हणाले पण आम्ही डोळ्यांनी ते पाहिलं आहे. त्या खुणा कशा आला असा आमचा सवाल आहे.
माझ्या मुलीला मारण्यात आलं…
तुम्हाला संशय काय आहे यावर बोलताना गौरी यांच्या वडिलांनी म्हटले की, माझ्या मुलीला मारण्यात आलं आहे. ती आत्महत्या करू शकत नाही, ती खूप स्ट्राँग होती. नातेवाईक यायच्या आधी पंचनामा का करण्यात आला? तुम्ही तुमच्या बहिणीला फोन का केले? तुम्ही यात दोषी नाहीत तर फरार का झालेत याचं उत्तर द्यावं असंही गौरी यांच्या वडिलांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही
पंकजा ताईंनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला, त्यांच्याकडे पाहूण मी मुलगी दिली होती. आम्हाला याप्रकरणी न्याय द्या अशी विनंती मी ताईंकडे केली. त्यांनी सांगितले की, माझा पीए आहे म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही. या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल. तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल असं गौरी यांच्या वडिलांनी म्हटले आहे.
