पाणीपुरीचं साहित्य आणायला गेले, पण मृत्यूने गाठलं; दोन सख्ख्या भावांचा अपघाती अंत
जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळे भीषण अपघात घडले आहेत. जळगाव शहरात रिक्षा आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन भावांचा मृत्यू झाला, तर मुक्ताईनगरजवळ ट्रॅव्हल्स अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू आणि २०-२५ जण जखमी झाले.

जळगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत. यात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील जुना निमखेडी रोडवर एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील ज्ञानेश्वर झगडू शिवदे आणि प्रमोद झगडू शिवदे या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शिवदे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अवजड वाहनांची मोठी वर्दळ
ज्ञानेश्वर शिवदे हे शिवसेनेच्या शहरप्रमुख ज्योती शिवदे यांचे पती आहेत. तर प्रमोद शिवदे हे त्यांचे दीर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आणि माल घेण्यासाठी हे दोन्ही भाऊ पहाटे चार वाजता रिक्षाने जात होते. त्यावेळी हा अपघात घडला. या रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महानगराध्यक्ष आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबातील दोन्ही करते पुरुष गमावल्याने शिवसेनेच्या शहरप्रमुख ज्योती शिवदे यांनी प्रचंड आक्रोश केला. याप्रकरणी अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुक्ताईनगरमध्ये ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
तर दुसरीकडे मुक्ताईनगरजवळ महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण ठार आहेत. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. महामार्गावर क्रेनने ट्रॅव्हल्सला बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील जखमींवर मुक्ताईनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
