रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा कसा पडला? एकनाथ खडसेंनी व्यक्त केला मोठा संशय, घटनाक्रमही सांगितला
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती समोर आली आहे. सुमारे एक लाखाहून अधिक रोकड लुटण्यात आली, सीसीटीव्ही डीव्हीआर देखील नेण्यात आला.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला. या दरोड्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
नेमकं काय घडलं?
मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्ग-६ (NH-6) वरील रक्षा ऑटो फुएल्स (रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप), तसेच कर्की आणि तडवेल येथील अशा एकूण तीन पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी पेट्रोल पंपाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली.
पेट्रोल पंपवर दरोडा घालणारे गुन्हे गार हे मध्यप्रदेशातून आल्याचा संशय आहे. ते कर्कीला पहिल्यांदा गेले, तिथून ते या पेट्रोल पंपावर आले. त्यानंतर मग ते वरांदा मार्गे फरार झाल्याचे दिसत आहे. मध्यरात्री मोटारसायकलवरून आलेल्या ५ दरोडेखोरांच्या हातात देशी कट्टे होते. त्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवला. कर्मचाऱ्यांना मारहाण केली. केबिनमध्ये तोडफोड केली आणि सुमारे एक लाखांहून अधिक रोकड लुटून नेली. तसेच दरोड्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील सोबत नेला, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.
माझ्या मुलीची मालमत्ता सुरक्षित नाही, तर मग सामान्य नागरिकांचे काय?
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत पाचपैकी तीन संशयित आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. स्वतःच्या केंद्रीय मंत्री असलेल्या मुलीच्या पंपावर दरोडा पडल्याने एकनाथ खडसे यांनी या घटनेचे गांभीर्य व्यक्त करत थेट राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी घटनास्थळी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. एकीकडे केंद्रीय मंत्री असलेल्या माझ्या मुलीची मालमत्ता सुरक्षित नाही, तर मग सामान्य नागरिकांचे काय? मुक्ताईनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे., असा घणाघात खडसेंनी केला.
यावेळी एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरमधील अन्य एका गंभीर घटनेचा संदर्भ दिला. काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली होती. त्या घटनेतील आरोपी देखील अजूनपर्यंत पकडलेला नाही. याचा अर्थ पोलीस प्रशासनाचे गुन्हेगारांवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असाही आरोप एकनाथ खडसेंनी केला.
