
मृत्यू आणि जीवन यांच्यातील सीमारेषा कधीकधी इतकी धूसर होते की, त्यावर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जाते. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात असाच एक विचित्र आणि तितकाच हृदयस्पर्शी प्रसंग घडला. ज्यामुळे संपूर्ण गाव क्षणार्धात शोकातून आनंदात न्हाऊन निघाले. ज्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती, तेच ६५ वर्षीय आजोबा जिवंत परतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
गेले काही दिवस पाळधी गावातील ६५ वर्षीय रघुनाथ खैरनार हे बेपत्ता होते. कुटुंबिय आणि गावकरी त्यांच्या शोधात होते. अशातच रेल्वे रुळावर एक अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शरीरयष्टी, अंगातील कपडे, पायातील चप्पल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंगावरील गोंदलेले खुणा या रघुनाथ खैरनार यांच्याशी इतक्या मिळत्याजुळत्या होत्या की कुटुंबियांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचा समज करून घेतला. यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला आणि गावात शोककळा पसरली.
मन हेलावून टाकणाऱ्या या प्रकारानंतर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले. मृतदेह घरी आणण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी मोठ्या लगबगीने सुरू झाली. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना आता फक्त अखेरचा निरोप देण्याची औपचारिकता बाकी होती. अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती. चिता रचली जात होती, मंत्रोच्चारांनी वातावरण गंभीर झाले होते. त्याच वेळी, अचानक एक धक्कादायक दृश्य समोर आले. दारातून रघुनाथ खैरनार स्वतःच्या पायांनी चालत घरात येत असल्याचे पाहून कुटुंबातील सदस्यांना आणि उपस्थित गावकऱ्यांना मोठा धक्का बसला.
क्षणभर कुणालाच काही कळेना. डोळ्यासमोर आपल्या आजोबांचा मृतदेह समजून ठेवलेले पार्थिव आणि त्याच क्षणी जिवंत, सुखरूप परतलेले आजोबा! हे नेमकं काय घडतंय, याचा विचार करत सर्वजण अवाक् झाले. मृत्यूच्या दारातून परतलेल्या रघुनाथ खैरनार यांना पाहताच काही क्षणांपूर्वी शोकसागरात बुडालेले कुटुंब आनंदाने गहिवरले. डोळ्यातील अश्रू अचानक आनंद अश्रुत बदलले. पाळधी गावही या अनपेक्षित पुनरागमनाने हादरुन गेले. जे मृत झाले म्हणून अंत्यसंस्कार करणार होते, तेच प्रत्यक्षात परतल्याने कुटुंबियांबरोबरच ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
गोंधळातून सुटका झाल्यानंतर, कुटुंबियांनी रघुनाथ खैरनार यांचे मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात घरी औक्षण करून स्वागत केले. “आम्हाला वाटलं की… पण देव तारी त्याला कोण मारी!” अशा भावना त्यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आता रेल्वे रुळावर सापडलेला तो मृतदेह नेमका कुणाचा होता आणि रघुनाथ खैरनार एवढे दिवस कुठे होते? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.