Jalna | आमचा देव आणून द्या, अन्यथा अख्खा गाव अन्न सोडणार, जांब समर्थ गावकऱ्यांचा इशारा, गावात शुकशुकाट
मूर्ती चोरट्यांनी पळवल्यानंतर पोलिस यंत्रणेचीही झोप उडाली आहे. विधानसभेतही याचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाचा वेगाने तपास करण्याचे आदेश दिलेत. मात्र जांब येथील मूर्तींचा अद्याप शोध लागलेला नाही.

जालनाः जिल्ह्यातील जांब समर्थ (Jamb Samarth) येथील रामदास स्वामींनी (Ramdas Swami) पूजलेल्या मूर्ती चोरीला गेल्यामुळे अवघा गाव खिन्न अवस्थेत आहे. रविवारी रात्रीतून जांब येथील राम मंदिरातील पंचधातूंच्या 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्यात. पण मंगळवारी सकाळपर्यंत या मूर्तींचा किंवा चोरट्याचा शोध लागलेला नाही. महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामदास स्वामी यांच्या जन्मगावीच ही चोरीची घटना घटल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. लवकरात लवकर मूर्तींचा शोध (Jalna Theft) लागला नाही तर अवघा गाव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या चोरीच्या घटनेमुळे जांब समर्थ गावासह संपूर्ण जालना जिल्ह्यात अस्वस्थता आहे. जांब समर्थ गावात प्रचंड शुकशुकाट पहायला मिळतोय. मंदिरातील एकूण पाच ते सहा मूर्ती चोरीला गेल्यात. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने तात्पुरता श्रीरामाचा दुसरा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात येतेय, मात्र आमला देव हरवल्याच्या भावनेने गावकरी व्याकुळ आहेत.
गावात, शेतात सर्वत्र शोधाशोध
काल दिवसभर पोलिसांच्या सूचनेनुसार गावकऱ्यांनी तपास घेतला. चोरट्याने गावाबाहेर मूर्ती नेल्या नसतील, जमिनीत, शेतात ठेवल्या असतील, शोध घ्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार सगळ्यांनी टीम करून आपापल्या शेतात, संशयित ठिकाणी शोधमोहिम राबवली. समर्थांचे ११ वे वंशज भूषण महाराज रात्री इथं पोहोचले. त्यानंतर सर्व गावकरी जमा झाले होते. त्यांच्यात या चोरीबद्दल तीव्र नाराजी आहे. आजपासून अन्नत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिला. पण प्रशासन आणि माध्यमांनी दखल घेतल्यामुळे आम्ही अजून दोन दिवस तपासासाठी देत आहोत. त्यानंतर अन्नत्याग करून समर्थ मंदिरात गावकरी अन्नत्यागासाठी बसणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब तांगडे यांनी दिली.
समर्थ रामदास स्वामी यांच्या #जांब या जन्मगावी राम लक्ष्मण सीता मारुती मूर्ती ची चोरी झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी व सर्व समर्थ भक्तांनी सर्व कलेक्टर. सिपी. पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात यावे.#श्रीमहंत2024 pic.twitter.com/MbQrX9KXfI
— Shri Mahant sudhirdas Maharaj (@mahantpt03) August 23, 2022
‘आमचा देव चोरट्यांनी नेला…’
गावातील अन्य नागरिकांनीही चोरीबद्दल तीव्र नाराजी दर्शवली. ते म्हणाले, आज आमचा देव नाहीये. पण आमच्या भावना आहेत. दररोजच्या आरतीला आम्ही इथे येत आहोत. चोरट्यांनी देव नेला. शोधकार्यासाठी प्रशासन कामाला लागलंय, पण आमची सर्व गावकऱ्यांची विनंती आहे. मूर्ती आपण दुसऱ्या आणू शकतो, पण समर्थांचा ज्यांना स्पर्श झालाय, समर्थांनी ज्यांची पूजा केली त्या आमच्या श्रद्धा चोरट्यांनी नेल्या. त्यामुळे आम्ही प्रशासनाला वेळ देतोय, पण उद्यापासून संपूर्ण गाव अन्नत्याग करणार आहोत, अशी प्रतिक्रिया संतोष तांगडे यांनी दिली.
माझ्या घनसावंगी मतदारसंघातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातील श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. जांब समर्थ येथे राज्यभरातून लोक दर्शनासाठी येतात.परंतु या घटनेमुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. pic.twitter.com/GwpeHhMybT
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 22, 2022
कोणत्या मूर्तींची चोरी?
जालना येथील घनसावंगी तालुक्यात जांब समर्थ हे रामदास स्वामी यांचे जन्मगाव आहे. समर्थ रामदासांचं येथे प्राचीन घर असून त्या ठिकाणी एक राम मंदिर आहे. समर्थ ज्या राम-सीतेच्या मूर्तीची पूजा करायचे, त्या पंचधातूंच्या मूर्ती तसेच राम-लक्ष्मण-सीता, भरत, शत्रुघ्न यांचे पंचायतन तसेच समर्थांच्या झोळीतील हनुमानाची मूर्तीदेखील चोरीला गेली आहे. प्रत्यक्ष रामदास स्वामींनी पूजलेल्या या मूर्तींवर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे. याच मूर्ती चोरट्यांनी पळवल्यानंतर पोलिस यंत्रणेचीही झोप उडाली आहे. विधानसभेतही याचे पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाचा वेगाने तपास करण्याचे आदेश दिलेत. मात्र जांब येथील मूर्तींचा अद्याप शोध लागलेला नाही.
