‘त्या’ व्हायरल व्हीडिओवर एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, तेव्हा आम्ही…
CM Eknath Shinde on Viral Video Devendra Fadnavis Ajit Pawar Press conference : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 'तो' व्हीडिओ व्हायरल; एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं, म्हणाले...

जालना | 14 स्पटेंबर 2023 : मराठा आरक्षणाचं आंदोलन अधिक तीव्र होत असताना सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधीचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील संभाषणावर टीका केली जात आहे. या संभाषणावर आक्षेप घेत नेटकऱ्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावर जोरदार टीका केली आहे. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जालन्यात बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
परवा जी पत्रकार परिषद झाली. त्यातला मागचा पुढचा भाग काढला आणि मधला तेवढाच व्हीडिओ दाखवला. आमचा माध्यमांवर विश्वास आहे. हा तर विश्वासघात झाला. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत येत होतो. आमची बैठक ही साडेबारा एकपर्यंत ही बैठक चालली. त्या बैठकीनंतर आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उत्तरं नको. मीही म्हणालो, प्रश्न उत्तरं नको आणि राजकीय वक्तव्यही नको. फक्त बैठकीत जे ठरलं आहे तितकंच बोलायचं आणि निघायचं, असं मी बोललो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
आता मी काही असा माणूस आहे का की लोकांना लॉलिपॉप देईल. सामान्य माणूस राज्याचा मुख्यमंत्री कधी होतो, जेव्हा तो प्रामाणिक असतो. ईमानदार असेल तर तो या पदावर पोहोचतो. माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीच नसतं. असं मी कधी केलं नाही. करणारही नाही. जे आहे ते समोर… त्यामुळे हा व्हीडिओ पूर्ण बघून लोकांनी प्रतिक्रिया द्यावी असं शिंदे म्हणाले.
व्हीडिओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर सध्या एक व्हीडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकार परिषदेसाठी येत आहेत. यावेळी आपल्याला जे बोलायचं ते बोलून मोकळं व्हायचं, असं शिंदे म्हणताना दिसतात. तर त्याला हो… येस, असं म्हणत अजित पवार उत्तर देतात. तितक्यात माईक चालू आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्यावर ऐकू जाईल, असं अजित पवार म्हणतात. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
