Manoj Jarange: कुणबी प्रमाणपत्राशिवाय सरकारला सुट्टी नाही…मनोज जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकला, आता सर्वात मोठे….
Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation: मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्र सरकारने का रोखले? असा सवाल त्यांनी विचारला. अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange Patil Maratha Reservation Agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा -कुणबी प्रमाणपत्रावरून फडणवीस सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. कितीही चांगले वागले तर हे सरकार मराठ्यांनी असं का वागतं, प्रमाणपत्र का रोखले? असा सवाल त्यांनी केला. अंतरवाली सराटीत मोठे आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. 30 तारखेला मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या तारखेपूर्वी फडणवीस सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली. अंतरवाली सराटीत समाजातील लोकांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाविषयी बाजू मांडली.
प्रमाणपत्र का रोखले?
राज्यात मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. पण प्रत्यक्षात अधिकारी कुणबी प्रमाणपत्र वितरीत करताना सरकारकडे बोट दाखवत आहेत. सरकारने कुणबी प्रमाणपत्र का रोखले असा सवाल त्यांनी विचारला. तीन चार महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतो असे विधान केले. मग कुणबी प्रमाणपत्र न दिल्याबद्दल त्यांनाच जबाबदार धरण्यात यावेत असे जरांगे पाटील म्हणाले.
58 लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्या ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र द्या आणि मराठ्याचं मनं जिंका. आंदोलनाच्या तारखेपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. हैदराबाद संस्थानचा जीआर सरकारने काढला. त्याची अंमलबजावणी केली. पण पुढे प्रमाणपत्र देण्यात आली नाही. त्या जीआर प्रमाणेच आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सातारा संस्थानचा गॅझेट आधारे कुणबी प्रमाणपत्राचा जीआर का काढला नाही. कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान यांचा जीआर 1994 च्या धरतीवर काढण्यात यावा. जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही. तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाज पुन्हा एकदा मोठे आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला.
तर समाजासाठी प्रामाणिक काम केले म्हणूनच अंतरवाली सराटीत आज मोठ्या संख्येने समाज बांधव माझ्यावर विश्वास ठेवून आल्याचे ते म्हणाले. समाजाशी बेईमानी मी करत नाही. तशी करणारी गँग वेगळी आहे. त्यांचं चालू आहे. मी उपाशी मरेल पण खोटं बोलून पैसे कमवणार नाही असे सांगत त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता सर्वात मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.