जनआक्रोश मोर्चात फूट? सुरेश धस मोर्चासाठी आले, पण गेलेच नाही; आव्हाड ठरले अडचणीचे?
मुंबईतील जनआक्रोश मोर्चात भाजप नेते सुरेश धस अनुपस्थित राहिले, तर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षय शिंदेबाबतच्या विधानामुळे मोर्चात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. धस यांनी आव्हाडांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे तर आव्हाड यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकजुटीने सुरू असलेल्या जनआक्रोश मोर्चात आज फूट पडल्याचं चित्र होतं. मुंबईत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजपचे नेते सुरेश धस प्रत्येक जनआक्रोश मोर्चात सर्वात पुढे असतात. आज मात्र, ते मोर्चासाठी मुंबईत खास मोर्चासाठीच आले, पण मोर्चाकडे फिरकलेच नाही. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची बाजू घेतली आणि तिथेच मिठाचा खडा पडला. आव्हाड यांनी जाहीर भाषणात केलेल्या विधानामुळे सुरेश धस मोर्चाकडे आलेच नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जनआक्रोश मोर्चात फूट पडल्याचंही चित्र निर्माण झालं आहे.
संपूर्ण मराठवाडा पिंजून काढल्यानंतर आज जन आक्रोश मोर्चा मुंबईत आला. या मोर्चासाठी संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईत आलं होतं. सुरेश धसही खास मोर्चासाठी मुंबईत आले होते. मी खास मोर्चासाठीच मुंबईत आलोय. मला मुंबईत यायला साडे सहा सात तास लागले. आता मी तिकडेच निघालो आहे. हा मोर्चा नाही. हा पब्लिक क्राय आहे, असं सुरेश धस यांनी सांगितलं होतं. देशमुख कुटुंबीयांना बोलावल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ते जातातच. मुंबई ही राजधानी आहे. संतोष देशमुख यांचा प्रश्न मी लावून धरला. त्यामुळे आता मीही मुंबईकरांसोबत आहे. आज आम्ही मुंबईकर आहोत. आम्ही बोलणार आणि आमच्या व्यथा मांडणारच, असंही सुरेश धस म्हणाले होते.
आव्हाड बोलले अन् अडचण झाली
सुरेश धस यांनी सकाळीच माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर मोर्चाकडे जायला निघाले होते. इकडे मोर्चा सुरू झाला होता. जितेंद्र आव्हाड यांनी मोर्चाला संबोधित केलं. यावेळी आव्हाड यांनी उघडपणे अक्षय शिंदेची बाजू घेतली. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही. इतरांना वाचवण्यासाठी त्याला मारलं गेलं. अक्षयला मारल्यानंतरच आरोपी कसे काय समोर आले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांच्या या भाषणामुळेच धस या मोर्चात आले नसल्याचं सांगितलं जात.
धस यांची नाराजी
धस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त केली. मी जितेंद्र आव्हाड यांचं स्टेटमेंट पाहिलं. अक्षय शिंदेच्या बाबतचं त्यांचं आजचं स्टेटमेंट मला आवडलं नाही. मला त्यांच्याशी भांडायचं नाही, असं सांगतानाच सहा सात तासाचा प्रवास करून आलो होतो. एका ठिकाणी फ्रेश व्हायला गेलो. मला उशीर झाल्याने मोर्चात गेलो नाही, असं धस यांनी म्हटलंय. तसेच मोर्चाला माणसं कितीत येतात यापेक्षा लोकांच्या भावना पोहोचल्या हेच समाधान आहे, असं धस म्हणाले.
तर धस यांच्या विधानावर आव्हाड यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अक्षय शिंदे याची हत्याच आहे आणि मला यासंदर्भातील माहिती आहे त्यामुळे मी बोलतो. न्यायदानाच्या भूमिकेत मी जात नाही मी फक्त वस्तूस्थिती मांडत आहे. न्यायदानाच्या भूमिकेत सरकार जात आहे आणि ही हत्या घडवून आणत आहेत. हा माझा आरोप आहे. न्यायदान करण्यासाठी कोर्ट आहे आणि तिथे बसलेले न्यायाधीश आहेत ना मग बाहेर ही नवीन न्यायदानाची भूमिका का? याचा अर्थ तुम्ही संविधानाला मानत नाही. असं सांगतानाच माझी भूमिका मांडण्याचा मला अधिकार आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. मला त्याच्याशी घेणंदेणं नाही, असं आव्हाड म्हणाले. यामुळे जन आक्रोश मोर्चातील नेत्यांमध्येच बेबनाव असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
