त्यांचा वरचा मजला… राज ठाकरेंवर बोलताना वकील जयश्री पाटील यांची जीभ घसरली
डान्सबारच्या मुद्द्यावरून वकील जयश्री पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना इशारा देखील दिला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना वकील जयश्री पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मला असं वाटतं राज ठाकरे यांना अभ्यासाची गरज आहे, राज ठाकरे यांचा वरचा मजला पूर्णपणे रिकामा दिसतो, सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टीस गडकरी यांचं स्टेटमेंट वाचा, तेव्हा तुम्हाला कळेल डान्सबार कधीच बंद नव्हता. तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल, असं जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, डान्सबार हे अमराठी लोकांचे नाही तर मराठी लोकांचे आहेत, मी आहार संघटनेची वकील आहे. मी खात्रीने आणि अभ्यासपूर्वक सांगते की जे वक्तव्य राज ठाकरेंनी केलं ते स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केलं आहे. राज ठाकरे तुम्ही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता ते कधीही खपवून घेणार नाही.
डान्सबार आणि ऑर्केस्ट्रा बारचे जे मालक आहेत ते हिंदुस्तान मधीलच नागरिक आहेत. तुम्हाला विचारून लायसन द्यायचं का? तुम्ही कोण आहात तुमचा अभ्यास काय आहे? कमिशनर होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का? किती अभ्यास करावा लागतो. तुम्ही अभ्यास करा आणि मगच अभ्यासपूर्वक बोला, असं पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
भारत आपला देश आहे आणि या देशाच्या नागरिकांना देशात कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, राज ठाकरे माणसांमध्ये फूट पाडण्याचा आणि भाषेवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्यवसाय व्यवसाय आहे तुम्ही या व्यवसायाला राजकारणात आणू नका असा माझा इशारा आहे, असंही यावेळी जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील जयश्री पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन राजकीय नापास प्रगती पुस्तकाचे हे माणसं आहेत, हे दोघं एकत्र आले तरी शिल्लक राहणार नाहीत, चांगल्यांची संगत सुटल्यानंतर लोक अभ्यासाला सुरुवात करतात, असंही यावेळी जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे.
