Karuna Munde : करुणा मुंडे यांची मोठी राजकीय घोषणा, मुंडे कुटुंब तुम्हाला सून मानत नाही, त्या प्रश्नावर म्हणाल्या की…
Karuna Munde : "रुपाली ठोंबरे पाटील यांना मी माझ्या पक्षात प्रवेश देणार नाही. त्यांना मी कधी महिलांसाठी लढताना बघितलेलं नाही. अशा लोकांची मला गरज नाही. जे स्वत:साठी भांडतात, ते दुसऱ्याला न्याय कुठून देणार?" असं करुणा मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांचा स्वराज्य शक्ती सेना हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे. यात जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायतीची निवडणुका लढवणार असल्याचं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं. ‘माझी मुंबईत दोन-तीन मोठ्या पक्षांसोबत बैठक आहे‘ असा दावा करुणा मुंडे यांनी केला. “मी मागच्या दोन वर्षांपासून संघर्ष करतेय, लढतेय. मी जेलमध्ये होते, तेव्हा माझे कार्यकर्ते दीड महिना बाहेर बसून होते. त्यांना तिकीट मिळणार की नाही? हे पाहून युती करणार“ असं करुणा मुंडे यांनी जाहीर केलं.
‘महाराष्ट्राची नाव बुडतेय. कोणाचा तरी हात धरुन पुढे जाता येत असेल तर का नाही जायचं?’ असा सवाल करुणा मुंडे यांनी केला. “मी स्वत: निवडणूक लढवणार नाही. मी निवडणुकीला उभी राहिली, तर ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना सपोर्ट करता येणार नाही“ असं करुणा मुंडे म्हणाल्या. “आपल्याकडे धमाका आहे. मागच्या तीन वर्षांपासून माझं काम बघितलय. मला एका पत्रकाराने चांगला प्रश्न विचारलेला, तुम्ही पाच अशी मोठी काम सांगा, की लोक तुमच्या उमेदवाराला निवडून देतील. गेल्या तीन वर्षात मी मोठी कामं केली आहेत. ज्यामुळे लोक आपल्याला निवडून देतील“ असं करुणा मुंडे म्हणाल्या.
यावर पत्रकार परिषद घेतली, तर तीन तास लागतील
“आपल्याकडे 1 कोटी रुपये आले तर इन्कम टॅक्सवाले येतात. 1800 कोटीची जमीन एका युवा मुलाने विकत घेतली, तर विचारणारे कोणी नाही. असे खूप लोक आहेत. यावर पत्रकार परिषद घेतली, तर तीन तास लागतील. माझ्याकडे यादी आहे. मी पुराव्यानिशी बोलते. अचानक जानेवारीत निवडणुका लागल्या. वेळ उरला नाही. नाहीतर, इलेक्शन आधी सगळं उघड करणार होते“ असा दावा करुणा मुंडे यांनी केला.
‘मी लहान मुलगी नाही, 45 वर्षांची स्त्री आहे‘
“सगळे मिळून खातायत. मी छोट्या घरातली आहे. मोठ्या घराण्याची सून आहे. गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे यांच्या घराण्याची सून असताना मला पक्ष काढावा लागतो. मी लहान मुलगी नाही, 45 वर्षांची स्त्री आहे. न्याय भेटत नाही“ असं करुणा मुंडे म्हणाल्या. तुम्ही मुंडे घराण्याची सून म्हणता पण ते मानत नाहीत, या प्रश्नावर करुणा मुंडे म्हणाल्या की, “असू दे ना. पडद्यामुळे इथे आता सूर्य दिसत नाहीय, म्हणून त्याचं अस्तित्व नाहीय का?. कोर्टाने मान्य केलय“
