वरून आदेश आलाय, माघार घ्यावीच लागेल, ठाकरे गटाच्या नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, राजकारणात खळबळ
डोंबिवलीत ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची उमेदवारावर दबाव टाकणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, 'माझा बळी दिला जातोय का?' या उमेदवाराच्या प्रश्नाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीचे २० उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटामध्ये अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तात्या माने आणि प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार वैशाली म्हात्रे यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात उमेदवारांवर माघारीसाठी कशाप्रकारे दबाव टाकला जातो, याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपाच्या गोंधळामुळे आणि समन्वयाच्या अभावामुळे ठाकरे गट आणि मनसे युतीत पेच निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीतील शहर शाखेत शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा वापर करून जिल्हाप्रमुख आम्हाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत आहेत, असा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच त्यांच्या हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली होती. या गोंधळानंतर आता प्रत्यक्ष त्यांच्या संभाषणाची क्लिप समोर आल्याने तात्या माने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
व्हायरल ऑडिओमधील खळबळजनक संवाद
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तात्या माने उमेदवार वैशाली म्हात्रे यांना पक्षाचा आदेश असल्याचे सांगून माघार घेण्यास सांगत आहेत. त्यावर वैशाली म्हात्रे यांनी विचारले, “साहेब, एका घरात दोन तिकीटं देता आणि आता मला सांगताय माघार घ्या, मी कशी काय माघार घेऊ?” यावर तात्या माने यांनी “वरून आदेश आले की आपल्याला ते पाळावे लागतात,” असे उत्तर दिले. यानंतर संतापलेल्या वैशाली म्हात्रे यांनी “म्हणजे आता माझाच बळी दिला जातोय का?” असा सवाल केला. हे सर्व संभाषण त्या क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे.
या सर्व वादावर जिल्हाप्रमुख तात्या माने यांनी आपली भूमिका मांडली आहे. उमेदवारी देताना सर्व बाबींचा अभ्यास केला जातो, मात्र काही तांत्रिक त्रुटी किंवा वरिष्ठांकडून जागावाटपात बदल करण्याच्या सूचना आल्यास त्याची अंमलबजावणी करावी लागते. ३० तारखेनंतर यादीत बदल शक्य नव्हता, त्यामुळे मर्यादित वेळेत ही दुरुस्ती करावी लागली. मी केवळ पक्षप्रमुखांच्या आदेशाचे पालन केले आहे, असे तात्या माने म्हणाले.
या प्रकारामुळे ठाकरे गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एबी फॉर्ममधील गोंधळ, महिला उमेदवारांवर टाकण्यात आलेला दबाव आणि कार्यकर्त्यांना डावलून घेतलेले निर्णय यामुळे डोंबिवलीत ठाकरे गटाची घडी विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. या संधीचा विरोधकांनी फायदा घेत ठाकरे गटावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
