केडीएमसीचा महापौर कोण? महायुतीकडून तब्बल 11 नावं चर्चेत, खुर्चीसम्राट कोणाचा?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीला बहुमत मिळूनही महापौरपदावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे पुढे केल्याने सत्तेचा हायव्हल्टेज ड्रामा सुरू झाला असून, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेचा हायव्हल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. सध्या महायुतीकडे १०३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा असला, तरी महापौर कोणाचा? यावरुन शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. या दोन्ही पक्षांनी या प्रतिष्ठेच्या खुर्चीसाठी आपापल्या बाहुबलींना मैदानात उतरवल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
केडीएमसी महानगरपालिकेत भाजपचे ५० आणि शिवसेना शिंदे गटाचे ५३ असे एकूण १०३ नगरसेवक विजयी झाले आहेत. केडीएमसीत सत्ता स्थापनेसाठी लागणारा आकडा स्पष्ट असतानाही दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्याचे जास्त नगरसेवक, त्याचा महापौर या सूत्रावरून दोन्ही पक्षांत मतभेद पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही पक्षांनी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी ठेवत विरोधी गटातील नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
शिंदे गटाकडून कोणाचं नाव आघाडीवर?
शिवसेनेकडे ५३ नगरसेवक असल्याने त्यांचा दावा अधिक प्रबळ मानला जात आहे. शिवसेनेकडून महापौर पदासाठी शहरप्रमुख निलेश शिंदे, विकास म्हात्रे, रमेश जाधव, अस्मिता मोरे आणि शालिनी वायले यांचीही नावे शर्यतीत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे ४ ते ५ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असल्याने, शिवसेना आपला आकडा वाढवून भाजपवर दबाव आणण्याच्या तयारीत आहे. निलेश शिंदे यांची संघटनात्मक बांधणीवर पकड असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. तर विकास म्हात्रे यांच्याकडे डोंबिवलीतील नवनिर्वाचित आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
भाजपकडून पडद्यामागे हालचाली
भाजपकडे ५० नगरसेवक असून शिवसेनेपेक्षा केवळ ३ जागा कमी आहेत. त्यामुळे भाजपनेही महापौर पदावर आपला हक्क सांगितला आहे. भाजपकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले, वरुण पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमलता पवार, शशिकांत कांबळे आणि दया गायकवाड हे लोक महापौर पदाच्या शर्यतीत आहेत. दीपेश म्हात्रे हे अनुभवी आणि रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. तर राहुल दामले हे भाजपचे जुने आणि जाणकार नेतृत्व आहेत. सध्या भाजपने मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांचे समर्थन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली वाढवल्या आहेत.
दरम्या सध्या केडीएमसीत राजकीय वातावरण तापलेले असले तरी, महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सुटते, यावर बरेच काही अवलंबून असेल. जर आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी सुटले, तर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
