Ketaki Chitale : मराठी न बोलण्याने काय…केतकी चितळेचं वादग्रस्त विधान, नव्या वादाला तोंड फुटणार?
केतकी चितळे हिने मराठी भाषेविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Ketaki Chitale : सध्या राज्यात मराठी-हिंदी असा वाद चालू आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल, अशी मनसे, ठाकरे गट तसेच इतर पक्षांचीही भूमिका आहे. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळेही राज्यात भाषेविरोधात वाद पेटला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदर येथील परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर तर मराठी-हिंदी वाद जास्तच चिघळला. दरम्यान, आता याच मराठी-हिंदी भाषेच्या वादावर अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त विधान केलं आहे. मराठी न बोलल्यास भोकं पडणार आहेत का? असा सवाल तिने केलाय. तिच्या या विधानानंतर आता वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केतकी चितळे नेमकं काय म्हणाली?
लोक यातून आपली असुरक्षितता दाखवत आहेत. मराठीतच बोल. मराठी कसं येत नाही, असा दाबव टाकला जात आहे. अरे समोरची व्यक्ती मराठीत बोलेल किंवा बोलणार नाही. समोरची व्यक्ती मराठी भाषेत बोलली नाही तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे का? असा थेट सवाल केतकी चितळेने केलाय. तसेच समोरची व्यक्ती मराठी बोलली नाही तर भोकं पडणार आहेत का? मराठी बोलण्याचा दबाव टाकून तुम्ही तुमची स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात. कोणाच्याही आयुष्यात काहीही फरक पडत नाही, असंही केतकी चितळेनं म्हटलंय.
मराठी बोलण्यानेही भोकं पडतात का?
दरम्यान, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी तिच्यावर केतकी चितळेवर कठोर शब्दांत टीका केली आहे. केतकी चितळे यांचा मी बाईट पाहिला आहे. त्यांना बोलताना पाहिलं की त्या एखाद्या नशेच्या प्रभावात बोलत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते. त्या नेहमी त्याच भाषेत आणि त्याच पद्धतीने बोलतात. त्यामुळे केतकी चितळे यांच्या विधानाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्या विधानाला गांभीर्याने घेऊन महाराष्ट्रातील जातीय राजकारण आणखी खराब करण्याची गरज नाही, असं आनंद दवे म्हणाले. तसच मराठी न बोलण्याने भोकं पडत नसतील तर मराठी बोलण्यानेही भोकं पडतात का? असा सवालही दवे यांनी उपस्थित केला.
बरं केतकी चितळे यांनी उपस्थित केलेला विषय हा पूर्णपणे राजकीय आहे. कोणीतरी कोणत्यातरी पद्धतीने मराठी आणि अमराठी असं वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आनंद दवे यांनी केला.
