सुनील तटकरेंचा मोठा गेम; संवाद मेळाव्यातून भाजप-शिंदे सेनेला दिला धक्का, शेकडो कार्यकर्ते…
खोपोलीत शिंदेसेना आणि भाजपला पक्षप्रवेशाचा धक्का? दोन्ही पक्षांतील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

संतोष गोतार्णे टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संवाद मेळाव्यात मोठा पक्षप्रवेश झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या सुमारे 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे खोपोलीसह कर्जत-खालापूरमधील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
नेमकं काय घडलं?
रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील सुमारे 100 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. या पक्षप्रवेशामुळे खोपोलीसह कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया ताईंच्या वक्तव्याचं पुन्हा स्वागत करीन
खोपोली रायगड: सुनील तटकरे on डीलिमिटेशनवरून सुप्रिया सुळेंचं स्वागत केलंय मग भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील का या प्रश्नावर यावेळी सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी मत स्पष्ट केलं, आताही करतोय, संसदेमध्ये येणारं विधेयक त्या संदर्भामध्ये सुप्रिया ताईंनी केलेले वक्त्यव्य याचं मी मनापासून स्वागत केलंय.
विलीनीकरणाचा कुठलाही मुद्दा आज आमच्या सर्वांच्या समोर नाही. आम्ही सर्व जण आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करणं, संघटित करणं, जनतेपर्यंत पोहोचणं, शेतकऱ्यांपर्यंत जाणं याच विषयावरती कार्यक्रम घेऊन पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहोत, असं यावेळी तटकरेंनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले की, जे विधेयक आता येतंय त्या मध्ये ५० टक्के जागा समान वाढणार असतील, लोकसंख्येचा विचार न करता प्रत्येक राज्यातली संख्येच्या ५० टक्के आरक्षण दिलं जात असेल, तर त्याला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहील हे विधान सुप्रिया ताईनी केलं आहे. सुप्रियाताई लोकसभा खासदार आहेत, राज्यसभे मध्ये त्यांनी काम केलं आहे, उत्कृष्ट संसदपटू आहेत; त्यांच्या या विधानाचं मी पुन्हा एकदा स्वागत करीन एनडीएचा घटक म्हणून. एनडीएचा क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.