कंत्राटे मित्रांना देऊन बेस्ट खड्ड्यात घातली,या नेत्याची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका
मागील २५ वर्षात मित्र परिवारातील २१ कंपन्यांना मुंबई महानगर पालिकेची कंत्राटे वाटण्यात आली आहेत. त्यामुळे बेस्ट सारखी संस्था डबघाईला आल्याचे या नेत्याने स्पष्ट केले आहे.

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्टमध्ये कंत्राटी पद्धत लागू करुन हा उपक्रम खड्ड्यात घालण्याचे पाप केले आदित्य ठाकरे यांनी केले अशी जोरदार टीका शिवसेना सचिव किरण पावसकर यांनी केली आहे. बेस्टमध्ये कंत्राटीपद्धतीने बस आणल्या, हजारो कर्मचाऱ्यांची भरती केली. ज्या चार कंत्राटदारांनी बेस्टचे कंत्राट दिले हे चारही कंत्राटदार आदित्य ठाकरे यांचे मित्र असल्याचा आरोपही पावसकर यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की मागील २५ वर्षात आदित्य यांच्या मित्रपरिवारातील २१ कंत्राटदारांना मुंबई महापालिकेची कामे वाटण्यात आली. यातील १६ ते १८ कंपन्या काळ्या यादीतील आहेत आणि त्या सर्व अमराठी लोकांच्या आहेत. मिठी नदीचा गाळ उपसण्याचे कंत्राट देखील आदित्य यांच्या शिफारशीवरुन अभिनेता दिनो मोरिया याला देण्यात आले होते. दिनो मोरियाची चौकशी सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल, असे पावसकर म्हणाले. निवडणुका आल्या की मराठी भाषा आणि मराठी माणसाबाबत गळे काढायचे आणि पालिकेतील कंत्राटे मात्र अमराठी मित्रांना द्यायची, अशीही टीका पावसकर यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्ता असताना उबाठाने बेस्ट कामगारांसाठी काही केलं नाही, त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडले. बेस्टच्या कामगार वसाहतींची दुरवस्था झाली असल्याचे पावसकर म्हणाले. याउलट मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांबरोबरच बेस्ट कर्मचाऱ्यांनाही २९ हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांनी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांसाठी निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने एकत्र लढवल्यानंतरही यात त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. या पार्श्वभूमीवर किरण पावसकर बोलत होते.
