
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं. तसंच भाजपवर जोरदार निशाणा साधला. एकंदरीत नरेंद्र मोदी सरकार विरोधात नाराजी, दिलेली आश्वासन, केलेल्या घोषणा यामुळे मोदी यांच्या विरोधात सुप्त लाट आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेला 700 रुपये देऊन माणसं भाड्याने आणली जात आहेत. पंतप्रधान तिसऱ्या वेळी मतं मागायला येत असताना 10 वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे होतं. पण तसं न करता ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलत आहेत, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सरकार पैशाने मोदी की गॅरंटी अशी जाहिरात केली जात आहे. भारत सरकारची गॅरंटी म्हणत नाही तर केवळ मोदींची गॅरंटीं म्हणतात… म्हणजे केवळ मी मी मी असं म्हणत आहेत. विरोधकांना तुरुंगात टाकण्याचं काम हे करत आहेत. काँग्रेस पक्षाची बँकेतील तीन खाती गोठवली आहेत. विरोधक प्रचार करू नये, अशी व्यवस्था करत आहेत. आपल्या मनाप्रमाणे माणसं नेमून काम केलं जातं. त्यामुळे लोकशाही राज्य व्यवस्था राहील की नाही अशी शंका आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर दागिन्यांवर हल्ला केला जाईल. संपत्तीवर छापा टाकला जाईल असं सांगितलं जातं. 400 पार जाणार इतका आत्मविश्वास असेल तर काँग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल का बोलतात? काँग्रेसचं सरकार येणार या भीतीनं नको ती वक्तव्य केली जातात, हे दुर्दैवी गोष्ट आहे. भाजपची कार्यप्रणाली आहे की सर्व काही फुगवून सांगायचे आणि विरोधकांना नाराज करायचं. पण जी उदाहरणे आहेत त्यानुसार 400 पार याला काही अर्थ नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर घणाघात केला आहे.
भाजप नेते आणि खासदार ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे आम्हाला भीती आहे की हे संविधान बदलतील. महागाई, बेरोजगारी, शेतकरी मुद्दे हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर जात आहे. कायदा मागे घ्यायला शेतकऱ्यांनी भाग पाडले त्यामुळे मोदी सरकार शेतकऱ्यांचा सूड घेत आहे.शेतीच्या मालाची किंमत वाढत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. मोदी सरकारने लाखो हजार कोटींची उद्योगपतींची कर्जे माफ केली. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ केली नाही. त्यामुळे शेतकरी नरेंद्र मोदी यांचा पराभव केल्याशिवाय थांबणार नाहीत, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी शाब्दिक हल्ला केला आहे.