कुणाल कामरा शिंदे अवमान प्रकरणात विधानभवनात, थेट म्हणाला, पुन्हा मुंबईत शो करणार

Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे म्हटले होते. याप्रकरणी त्याच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो आज विधानभवनात आला होता.

कुणाल कामरा शिंदे अवमान प्रकरणात विधानभवनात, थेट म्हणाला, पुन्हा मुंबईत शो करणार
Kunal Kamra
Image Credit source: Google
| Updated on: Feb 17, 2026 | 3:35 PM

कॉमेडियन कुणाल कामराने 23 मार्च 2025 रोजी आपल्या शोमध्ये एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे सादर केले होते. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार इथल्या हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली होती होती. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामराविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. याप्रकरणी आज विधानभवनात हक्कभंग समितीसमोर सुनावणी पार पडणार होती, मात्र काही कारणामुळे ही सुनावणी पार पडली नाही. या सुनावणीसाठी कुणाल कामरा आज विधान भवनात दाखल झाला होता. यावेळी त्याने काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

पुढील सुनावणी 10 मार्चला

कुणाल कामराने म्हटले की, ‘मी संविधान मानणारा व्यक्ती आहे, काही कारणामुळे आज सुनावणी झालेली नाही. पुन्हा जेव्हा मला बोलवलं जाईल तेव्हा मी येईल. अनधिकृतपणे 10 मार्च ही तारीख देण्यात आली आहे. त्यावेळी मी येईल.’ शिवसेना कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तोडफोड केली होती, त्यानंतर आता तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का? यावर बोलताना कुणालने म्हटले की, ‘मला कोणत्याही हल्ल्याची भीती नाही.’

पुन्हा मुंबईत शो करणार

जनतेला तुमचं बोलणं पटतं मात्र सत्ताधाऱ्यांना का पटत नाही? या प्रश्नावर बोलताना कुणालने म्हटले की, ‘सत्ताधाऱ्यांना जे आवडत ते मी का बोलू. यासाठी दुसरे लोक आहेत.’ तसेच मुंबईत पुन्हा कॉमेडी शो आयोजित करणार का? या प्रश्नावर कुणालने म्हटले की, ‘मी नक्कीच आयोजित करणार आहे.’

दरम्यान, याआधी हक्कभंगाच्या नोटिशीला उत्तर देताना कुणालने म्हटले होते की, ‘व्यक्ती कोणतीही असो, मग ती सरकारमधली असो किंवा नसो. तिच्यावर अशी व्यंगात्मक वैयक्तिक टीका केली म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजात अडथळा ठरत नाही. माझ्या गाण्यामुळे मी कुठल्याही प्रकारे विधिमंडळाच्या कामात हस्तक्षेप केला नाही. यामध्ये फक्त टीका, व्यंग आणि कला वापरून मत मांडलं गेलं आहे. या गाण्याने जर मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला असेन, तर माझा हेतू सभागृहाचा अवमान किंवा तिथल्या सदस्यांना चिथावणी देण्याचा नव्हता.’