Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, 2100 रुपये कधीपासून मिळणार? आतली बातमी समोर
लाडकी बहीण योजनेंतर्ग राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे.

ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा करण्यात आली होती, ही योजना राज्यातील महिलावर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. दरम्यान जर राज्यात आमची सत्ता आली, तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू , लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं आश्वासनही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र सरकार सत्तेत येऊन वर्ष झालं, तरी देखील 2100 रुपयांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे राज्यातील सर्व महिला वर्गाचं आता लक्ष लागलं आहे.
आता या योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. काल मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता, या प्रश्नाला उत्तर देताना आता मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे, योग्य वेळी तो निर्णय घेतला जाईल असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नका, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे, ते नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारसभेत बोलत होते.
दरम्यान पुढचे 72 तास आपल्याला मेहनत घ्यायची आहे, मुंबईत शिवसेना भाजपला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईकर जमणार आहेत. 287 ठिकाणी नगर पालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट लढला, त्यांचे नगराध्यक्ष निवडून आले 8, आमचे 72 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले. आमच्या समोर जरी भाजपा असली तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करीत आहोत. मी सगळ्या लाडक्या बहिणींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, आभार मानतो. आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल, असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
