
राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या सभेला संबोधित केले. ही निवडणूक केवळ मतदानापुरती नाही, तर सिंधुदुर्गाचा आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारी आहे. त्यामुळे महायुतीला मत म्हणजे विकासाला मत हे लक्षात ठेवून सर्वांनी मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी लाडकी बहिणींना खुशखबर दिली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
प्रचारसभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, ज्या घोषणा आम्ही आमच्या वचननाम्यात केलेल्या आहेत त्या योग्य वेळी देणार आहोत. कारण जो आम्ही वचननामा प्रसिद्ध केला आहे तो 100 टक्के पाळणार. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी कितीही अफवा पसरविल्या तरी वाचननाम्यात जे वचन दिले आहे ते पाळणार. याचाच अर्थ आगामी काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
कोकणातील निवडणुकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, कोकणात सगळीकडे महायुतीचे भगवे वादळ घोंगावत आहे. येथे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे एकत्र आले आहेत. महायुती एकत्र आली असून दीपक केसरकर त्यांच्यासोबत आहेत. कार्यकर्त्यानी ठरविले आहे की, राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद काम करेल. त्यामुळे ही जिल्हा परिषद महायुती 100 टक्के जिंकेल. या जिल्हा परिषदेला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्या दाओस दौऱ्यात कोकणासाठी विशेष प्रकल्प उभारण्यासाठी करार करण्यात आले आहे. यावरील प्रश्नावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘दाओस दौऱ्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. येथील तरुणांना रोजगार मिळेल. तसेच नवीन मुंबई-गोवा महामार्ग करतोय. त्याचा डीपीआर तयार झाला आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल.’