लाडक्या बहिणांना मोठा धक्का, खासदाराने केले धडकी भरणारे विधान
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेवरून सध्या राजकीय वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी ही योजना मत खरेदीसाठी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. योजनेचा निधी आणि त्याचे भविष्य याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. महायुती सरकारने दिलेले निधी वाढीचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.

महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेची सध्या सातत्याने चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेतंर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये देण्यात येतात. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप हे पैसे देण्यात आलेले नाहीत. त्याच आता काँग्रेस खासदाराने लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठे विधान केले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना धक्का बसला आहे.
काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आज सकाळी मी खरपुडीला जाऊन आलो आणि तेथील शेतकऱ्यांची सविस्तरपणे संवाद साधलेला आहे. परंतु तेथील शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेताना त्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की जो भाव इतरांना दिला आहे. तोच दर आम्हाला मिळावा अशी आमची रास्त मागणी आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीला आम्ही पाठिंबा दिला असल्याचं कल्याण काळे यांनी म्हटले.
नीलम गोरे ठाकरे गटातून गेल्यावर आरोप करायला लागल्यात
“उद्धव ठाकरे साहेबांवर जो काही आरोप नीलम गोरे यांनी केलेला आहे. आज आरोप करण्याच्या वेळी त्यांनी त्या वेळेला असा घटनाक्रम झालेला आहे, असं त्याच वेळी बोलायला पाहिजे होतं. आता नीलम गोरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निघून गेल्यावर असं आरोप करायला लागल्यात. राज्याच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापतींना असं वक्तव्य करणे लोकशाहीला लाजिरवाणा आहे”, असेही कल्याण काळे म्हणाले.
“विजय वडेट्टीवार काय बोलले मला माहित नाही. परंतु आपल्या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा लाभलेली आहे आणि याच साधुसंताच्या परंपरेमध्ये आपण सगळे येतो. त्यामुळे अशा पद्धतीचं काही बोललं गेलं असेल, तर ते बोललं जाऊ नये या मताचा मी आहे”, असेही कल्याण काळेंनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेबद्दल कल्याण काळे काय म्हणाले?
यानतंर त्यांना लाडकी बहिण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कल्याण काळेंनी प्रतिक्रिया दिली. “लाडकी बहिण योजना मतं खरेदी करण्यापुरती होते. यामुळे सरकारच्या तिजोरीवर मारलेला डल्ला आणि त्याच तिजोरीवरून आपल्या स्वतःसाठी मतं खरेदी करण्याचं काम या महायुती सरकारने केलं”, असा हल्लाबोल खासदार कल्याण काळे यांनी केला. “लाडक्या बहिणी योजनेला फक्त गोंडस नाव दिले. त्यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की ही योजना बंद होणार आहे”, असे विधान कल्याण काळेंनी केले. “हळूहळू या सरकारचे नाव युती सरकारऐवजी चौकशी सरकार असं नाव ठेवलं, तर योग्य होईल” असा टोलाही खासदार कल्याण काळे यांनी लगावला.
