
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी मोठी खेळी करत एका बड्या नेत्याला आपल्या पक्षात जागा दिली आहे. त्यामुळे निलडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढली आहे. हा नेता कोण आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. एक्सवर ट्वीट करत अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. अजित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, लातूर येथील माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांसह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पक्षाची शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा नवीन सहकाऱ्यांना समजावून सांगितली, त्या विचारांवर इमानइतबारे चालण्याचा संकल्प त्यांनी केला.
लातूर येथील माजी उपमहापौर श्री. चंद्रकांत बिराजदार यांसह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पक्षाची शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा नवीन… pic.twitter.com/O9L3fu8bOv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 10, 2025
चंद्रकांत बिराजदार हे पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये काँग्रेस नेते विक्रांत गोजमगुंडे महापौरपदी निवडून आले तेव्हा ते काँग्रेसच्या पाठिंब्याने उपमहापौर झाले. काँग्रेसच्या मदतीनंतरही बिराजदार हे भाजपमध्ये सक्रीय होते. 25 नोव्हेंबर रोजी विक्रांत गोजमगुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांच्या या निर्णयानंतर बिराजदार यांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि बिराजदार यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे पक्ष मजबूत झाला आहे. गोजमगुंडे यांनी महापौरपदाच्या काळात सामान्य नागरिकांसाठी केलेल्या कामामुळे त्यांना चांगली राजकीय ओळख मिळाली होती. आता गोजमगुंडे-बिराजदार जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भविष्यात शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे दोन्ही नेते आता काम करणार आहेत.