धक्कादायक! लातूरच्या मनपा आयुक्तांचं टोकाचं पाऊल, स्वत:वर झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडली आहे.

Latur Municipal Commissioner Suicide : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लातूरच्या महानगरपालिका आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहे. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र थेट महापालिका आयुक्तांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
लातूरचे महापालिका आयुक्त बाबासासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामागचं नेमकं कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. यामागे कौटुंबिक कारण आहे, की त्यांना काही कार्यालयीन तणाव होता, याचा शोध लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजताच पोलिसांची टीम त्यांच्या बंगल्यावर पोहोचली. बाबासाहेब मनोहरे यांनी ज्या पिस्तुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला, ती पिस्तुल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी काडतुसेदेखील ताब्यात घेतली आहे.
सध्या त्यांची प्रकृती कशी आहे?
मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पहाटे त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या डोक्यात गोळी लागून बाहेर निघालेली आहे. त्यामुळेच ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या कामाबाबत बोलायचं झाल्यास गेल्या सहा ते सात महिन्यांपासून त्यांचं पालिकेचं काम व्यवस्थित चालू होते. त्यांची आता बदली होणे अपेक्षित होते. मात्र असे असतानाच त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटने नेमकी कधी घडली?
घटनेची माहिती मिळताच लातूर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रकृतीची विचारपूस केली. लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांनीदेखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. शनवारी रात्री (5 एप्रिल) ही घटना घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर ते आपल्या खोलीत गेले होते. काही वेळाने त्यांच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर सर्वांनीच खोलीकडे धाव घेतल्यानंतर मनोहरे हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. त्यानंतर त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
