अकोलेमध्ये शिक्षकांचं कौतुकास्पद पाऊल, जमवले 30 लाख, उभारलं 70 ऑक्सिजन बेडचं सुसज्ज कोविड सेंटर!

ज्ञानदानासह या शिक्षकांनी आता जीवदानाचा संकल्प सोडला आहे. शिक्षकांनी मिळून तब्बल 30 लाख रुपये गोळा केले आणि त्यातून 70 ऑक्सिजन बेड असलेलं सुसज्ज कोविड सेंटर उभं केलं आहे.

  • मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी
  • Published On - 20:11 PM, 4 May 2021
अकोलेमध्ये शिक्षकांचं कौतुकास्पद पाऊल, जमवले 30 लाख, उभारलं 70 ऑक्सिजन बेडचं सुसज्ज कोविड सेंटर!
अकोले तालुक्यात शिक्षकांनी उभारले 70 ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पाहायला मिळत आहे. कुठे बेड उपलब्ध होत नाही. कुठे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. कुठे व्हेंटिलेटर्सची कमतरता भासतेय. तर कुठे रेमडेसिव्हीरचा काळाबाजार सुरु आहे. अशावेळी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांनी एक आदर्श पाऊल टाकलंय. ज्ञानदानासह या शिक्षकांनी आता जीवदानाचा संकल्प सोडला आहे. जिल्ह्यातील अतीदुर्गम अशा अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हते. अशावेळी जिल्ह्यातील काही शिक्षकांनी मिळून तब्बल 30 लाख रुपये गोळा केले आणि त्यातून 70 ऑक्सिजन बेड असलेलं सुसज्ज कोविड सेंटर उभं केलं आहे. (Teachers set up a 70-bed covid center at Akole in Ahmednagar district)

रुग्णांची हेळसांड, शिक्षकांची संवेदनशिलता

अकोले हा अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भाग आहे. या भागात आरोग्य सुविधेची आधिच वाणवा आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु होते. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी तालुक्यातील 191 गावांपैकी तब्बल दीडशेहून अधिक गावं कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. तालुक्यातील रुग्णालयात ऑक्सिजन बेडची उपलब्धता बोटावर मोजण्याएवढी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी एकत्र एक ऑक्सिजन बेड असलेलं सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शिक्षकांनी मिळून तब्बल साडे सतरा लाख रुपये गोळा केले. त्यांना काही दानशुरांनी मदत केली. त्यातून एकूण 30 लाख रुपये जमा झाले. या पैशाच्या माध्यमातून अकोले इथं 70 ऑक्सिजन बेड असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.

अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णांचा उपचारासाठी नाशिक, संगमनेरमधील रुग्णालयांत जावं लागत होतं. बाहेर जाऊनही बेड मिळत नसल्यानं अनेक रुग्णांचा जीव धोक्यात येत होता. ही गरज ओळखून अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्यानं उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

शिक्षकांच्या मोहिमेला उदंड प्रतिसाद

ऑक्सिजन बेड असलेलं कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय झाल्यानंतर तालुक्यातील संवेदनशील प्राथमिक शिक्षकांनी निधी जमवण्यास सुरुवात केली. अवघ्या दोन ते तीन दिवसांत अडीच लाख रुपये जमा झाले. या कार्यात इतका चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा तेव्हा कुणालाच नव्हती. आधी माध्यमिक – उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक पुढे आले. त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही सहकार्याची भावना दाखवली. काही दानशूर व्यक्तींनीही मोठी मदत देऊ केली. या सर्वांच्या सहाय्याने अकोले तालुक्यात 70 ऑक्सिजन बेडचं सुसज्ज असं कोविड सेंटर उभं राहिलं आहे.

प्रशासन, आमदार, आरोग्य कर्मचाऱ्यांचं सहकार्य

अकोले तालुक्यातील सुगाव इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हे सेंटर सुरु करण्यात आलं आहे. या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी प्रशासन आणि आमदार काळजी घेत आहेत. या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी ते पूर्ण वेळ काम करणार आहेत. अकोले तालुक्यातील शिक्षकांनी दाखवलेली ही संवेदनशिलता राज्यात अनेकांसाठी आदर्श ठरणारी आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात Mahindra कंपनी मैदानात, राज्यात Oxygen on Wheels सेवा सुरु

Beed Lockdown : बीड जिल्ह्यात तीन दिवस कडक लॉकडाऊन, काय सुरु? काय बंद?

Teachers set up a 70-bed covid center at Akole in Ahmednagar district