Maharashtra Landslide : महाराष्ट्रावर दरडींचा घाला, रत्नागिरी रायगड आणि साताऱ्यात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त, आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत.

Maharashtra Landslide : महाराष्ट्रावर दरडींचा घाला, रत्नागिरी रायगड आणि साताऱ्यात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त, आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
Raigad Talai Landslide

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसानं हाहा:कार माजलाय. चिपळूण आणि महाडमध्ये महापुराचं संकट ओढावलं असतानाच आता महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत. 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचं दिसून येत आहे. (Landslide incident in Ratnagiri, Raigad, Satara district)

महाडचं तळीये गाव उद्ध्वस्त, 36 मृतदेह हाती

महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 36 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते गिरीश महाजन तळई गावात पोहोचले आहेत. विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, असा संताप तळीये गावातून प्रवीण दरेकरांनी व्यक्त केला. या दुर्घटनेत 80 लोक दबले गेल्याची माहिती ग्रामस्थांनी केली आहे. आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह हाती लागले आहे. मात्र इतकं निर्लज्ज सरकार, प्रशासन आहे की त्यांना या घटनेची माहितीच नाही. काल दुपारी 4 वाजता ही घटना घडली तरी अजून मदत मिळू शकलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकर यांनी व्यक्त केलीय.

साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना, तिकडे साताऱ्यातही भीषण दुर्घटना घडली. मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत या भागातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे तर किल्ले मोरगिरी येथेही दरड कोसळल्याने महादेवाचे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. येथील परिसरातील ग्रामस्थांना प्रशासनाने इतरत्र हलवले आहे ही घटना ही गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दोन गावात अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली

चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीतही दरड कोसळल्यामुळे 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली आहे. यात काही कुटुंब अडकले असण्याची शक्यता आहे. खेड तालुक्यातील बिरमई इथं दरड कोसळलून 2 जण दगावले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खेडमधील धामणंदच्या दुर्घटनेनंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

चिपळूणमधील महापुरानं हाहा:कार माजल्याचं पाहायला मिळत आहे. पुरात अडकलेल्या जवळपास 1 हजार 800 लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. चिपळूणमध्ये एनडीआरएफच्या 4 टीम सध्या कार्यरत आहेत. लष्कर आणि नौदलाच्या 4 टीम चिपळूणमध्ये पोहोचत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. एअरफोर्सच्या 3 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सध्या बचावकार्य सुरु आहे. चिपळूणमधील कोविड रुग्णांचा मृत्यू हा ऑक्सिजनअभावी झाला नसल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 36 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Maharashtra Chiplun Landslide : चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडीत 17 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती, खेडमधल्या धामणंदमध्ये 17 घरांवर दरड कोसळली

Satara Landslide: साताऱ्यात आंबेघर गावात दरड कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Landslide incident in Ratnagiri, Raigad, Satara district

Published On - 3:07 pm, Fri, 23 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI