एक घर, दोन भाकरी; मराठा आंदोलकांची भूक भागवण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार, सर्वत्र मदतीचा महापूर
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाला राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. नांदेड, बीड, संभाजीनगर, चाळीसगाव आदी जिल्ह्यांतून अन्नसामग्री, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू आंदोलकांसाठी पाठवल्या जात आहेत.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी राज्याच्या विविध भागातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आंदोलकांना खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात अन्नसामग्री, पाणी आणि इतर आवश्यक वस्तू पाठवल्या जात आहेत. मराठवाड्यातील बीडमध नांदेड, चाळीसगाव, बीड, संभाजीनगर, पैठण आणि शिर्डीतून मदतीचा हात दिला जात आहे. यात अनेक गावागावातून भाकरी, ठेचा यांसारखे पदार्थ शिदोरी म्हणून दिले जात आहेत.
प्रत्येक घरातून एक शिदोरी
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इकळीमोर गावातून मराठा बांधवांनी तब्बल ५ हजार भाकरी, ठेचा आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन मुंबईकडे प्रवास सुरू केला आहे. एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी त्यांचा प्रवास सुरू आहे. तर दुसरीकडे, चाळीसगाव तालुक्यातल्या तळेगाव गावाने प्रत्येक घरातून एक शिदोरी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला जात आहे. त्यांनी ३ हजार पोळ्या, ५० किलो लोणचं, १०० किलो मिरचीचा ठेचा, आणि २ हजार पाण्याच्या बाटल्या जमा करून आंदोलकांसाठी मुंबईला पाठवल्या.
बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातूनही मोठी मदत पोहोचली आहे. पैठणमधून २ लाख चपात्या आणि ५० हजार भाकऱ्या आल्या आहेत. यासोबतच चटणी आणि लोणचंही पाठवण्यात आलं आहे. बीडमधून १ लाख पाण्याच्या बाटल्या आणि ६०० किलो मिक्स भाजी आंदोलकांसाठी तयार करून पाठवण्यात आली आहे.
मुंबईतील आंदोलकांना मोठा दिलासा
मराठा बांधवांच्या मदतीसाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातूनही पुढाकार घेण्यात आला. ‘एक घर, दोन भाकरी’ या सोशल मीडियावरील संदेशाला प्रतिसाद देत, येथील नागरिकांनी १ क्विंटल शेंगदाण्याची चटणी आणि २० हजार भाकरी गोळा केल्या. यासोबतच बिस्किटे आणि औषधोपचारासाठी आवश्यक साहित्य घेऊन तीन मालवाहू वाहने मुंबईकडे रवाना झाली. शिर्डी शहरातील मराठा समाज बांधवांनीही आंदोलकांच्या खाण्यापिण्याची सोय केली. ‘शंभूराजे प्रतिष्ठान’ आणि शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने घराघरातून चटणी-भाकरी जमा करून मुंबईला रवाना करण्यात आली. राज्यातील मराठा समाज एकजुटीने मुंबईतील आंदोलकांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र दिसत आहे. ही मदत केवळ अन्नसामग्री नसून, मराठा आंदोलनाच्या धैर्याला आणि एकीला बळ देणारी ठरली आहे.
