मराठा क्रांती मोर्चाचा कुणबी प्रमाणपत्रावर मोठा आक्षेप, मनोज जरांगे पाटील यांना थेट चॅलेंज
महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयानंतर, मराठा क्रांती मोर्चानं ओबीसीमध्ये मराठा म्हणून आरक्षणाची मागणी केली आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात विविध घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण केले होते. यानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटियरनुसार जात प्रमाणपत्र देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असताना दुसरीकडे मात्र मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यास मराठा क्रांती मोर्चाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच मराठा म्हणून आरक्षण मिळावे, अशी ठाम भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राजकीय पक्ष आणि समाजातील काही व्यक्ती जाणूनबुजून मराठा समाजाला संभ्रमात ठेवण्याचे काम करत आहेत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी केला. “कुणबी प्रमाणपत्र कधीही रद्द होऊ शकते. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण देणे योग्य नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना कुणबी म्हणून आरक्षण मिळावे, यात आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, ज्यांच्या जुन्या नोंदींमध्ये ‘मराठा’ असा स्पष्ट उल्लेख आहे, त्यांना आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असा आरोप सुनील नागणे यांनी केला.
मराठा म्हणून आरक्षण द्या, अन्यथा अन्याय होईल
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. अनेक पिढ्यांपासून आमची मराठा अशी ओळख आहे. त्यामुळे आम्हाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे. जर असे झाले नाही, तर मराठा समाजावर मोठा अन्याय होईल, अशी भीती सुनील नागणे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने जे हैदराबाद गॅझेट काढले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र तो जीआर केवळ कुणबी म्हणून नोंद असलेल्यांनाच फायदेशीर आहे. मराठा म्हणून नोंद असलेल्यांना त्याचा फायदा होणार नाही. आमची लढाई आम्हीच लढू. मराठा म्हणूनच ओबीसीमधून आरक्षण मिळवू, असे सुनील नागणे यांनी म्हटले.
दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षण आंदोलनात आता दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सरकारसमोरील आव्हान आणखी वाढले आहे. मराठा समाजामध्येच वेगवेगळ्या मागण्या पुढे येत असल्याने सरकारसमोर आता तोडगा काढण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
