Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पुन्हा अस्मानी संकट, 15 ऑक्टोबरला काय होणार ? IMDचा अलर्ट
Maharashtra Weather Update : परतीच्या पावसाचे संकेत मिळाल्यानंतर राज्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकलेला असतानाच आता 15 ऑक्टोबरला पुन्हा मोठ संकट येण्याचे संकेत आहेत. हवामान विभागानेही अलर्ट जारी केला आहे. काय होणार महाराष्ट्रात ?

यावर्षीच्या मान्सून हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातही महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यानंतर जून, जुलै मध्ये मध्यम पाऊस तर ऑगस्टमध्ये पावसाने कहर केला. सप्टेंबरमध्ये मान्सूनचा जोर कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु या काळात विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळा. अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, घरात-दारांत पाणी शिरलं, पिकं पाण्याखाली आली, शेतजमीन खरडून गेली, गुरु वाहून गेली, घर-संसार उघड्यावर केला.
आता, ऑक्टोबरच्या सुरुवातीला नैऋत्य मान्सून निघून जाईल अशी अपेक्षा होती. मान्सूनच्या परीतचा प्रवास सुरू झाल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र तेवढ्यात हवामानविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याने एक नवीन इशारा जारी केला आहे. ताज्या अहवालानुसार, 15 ऑक्टोबरपासून राज्यात मुसळधार पावसाची (Thunderstorm) आणखी एक फेरी सुरू होऊ शकते.
सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन
या संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने शेतकऱ्यांना कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि पाऊस किंवा जोरदार वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दुपारी मुसळधार पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो.
राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेली पिके वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित… pic.twitter.com/ZHanlAvSHe
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 12, 2025
खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही कोसळणार पाऊस
एवढंच नव्हे तर खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता नव्या अपडेट्सनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यासह मराठवाड्यात मुसळधार पावसानंतर, पावसाळा ऑक्टोबरमध्ये संपेल अशी अपेक्षा होती. मुंबईत, हवामान खात्याने अधिकृतपणे मान्सूनच्या प्रस्थानाची घोषणाही केली. 2 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या अनेक भागात अधूनमधून पाऊस सुरू होता. सुरुवातीला असा अंदाज वर्तवण्यात आला होता की 5 किंवा 6 ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णपणे माघार घेईल. आता पुन्हा एकदा राज्यात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
