Monsoon Update : मान्सूनच्या प्रवासात नेमका कशाचा अडथळा? किती टक्के पाऊस पडणार? हवामान तज्ज्ञ सानप यांनी दिली मोठी अपडेट

महाराष्ट्रामध्ये मान्सूनला विलंब होत असून, कोरडे वारे आणि अल निनोचा प्रभाव प्रमुख अडथळा ठरत आहे. हवामान तज्ज्ञ एसडी सानप यांच्या मते, यावर्षी सरासरी केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला, कारण मान्सून अजूनही तळ कोकणातच रेंगाळला आहे. हा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे.

Monsoon Update : मान्सूनच्या प्रवासात नेमका कशाचा अडथळा? किती टक्के पाऊस पडणार? हवामान तज्ज्ञ सानप यांनी दिली मोठी अपडेट
मान्सूनबद्दल हवामान तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Jun 16, 2026 | 1:14 PM

अर्धा जून उलटत आला तरी राज्यात पाऊस पडण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरवर्षी कोकणात मे महिन्यात दाखल झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यातच अख्ख्या राज्याला मान्सून झोडपून काढत असतो. पण यंदा मान्सूनचं चक्र उलटं फिरलेलं दिसत आहे. जूनचा अर्धा महिना झाल्यानंतरही मान्सून अजून आलेला नाही. हा मान्सून नेमका कुठे अडकला आहे? मान्सूनच्या प्रवासात कशाचा अडथळा येतोय? आणि यंदा राज्यात किती टक्के पाऊस पडणार? याची माहिती हवामान तज्ज्ञ एसडी सानप यांनी दिली आहे.

हवामान तज्ज्ञ एसडी सानप यांनी टीव्ही9 शी खास बातचीत केली. यावेळी मान्सूनच्या चक्राविषयी त्यांनी भाष्य केलं. पाऊस का पडत नाहीये? अल निनोचा काय परिणाम झाला आहे? या सर्व गोष्टी त्यांनी मांडल्या. मागच्या वर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर पोहोचला होता. गतवर्षी 26 मे रोजी मान्सून महाराष्ट्रात आला होता. गेल्या वर्षीची परिस्थिती वेगळी होती. यंदाची परिस्थिती वेगळी आहे, असं एसडी सानप म्हणाले.

म्हणून रखडला

8 जून रोजी मान्सून तळ कोकणात आला होता. आता मात्र तो पुढे सरकताना दिसत नाही. उत्तरेकडून येणारे जे कोरडे वारे आहे, त्यांचं प्रमाण या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटरवरच्या अंतरावर वाढलं आहे. आणि मान्सूनच्या प्रवासात ते अडथळा ठरत आहे. त्यामुळेच मान्सून रखडला आहे, अषशी माहिती त्यांनी दिली.

यंदा कमी पाऊस

अल -निनो हा पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सक्रिय झालेला आहे. येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्याचा परिणाम आपल्याकडे होणाऱ्या मान्सूनवर होणार आहे. म्हणजे आपल्याकडे अल निनोमुळे कमी प्रमाणात मान्सून होणार आहे. यावर्षी पाऊस सरासरी 90% एवढाच पडणार आहे, असंही सानप यांनी सांगितलं.

त्याकडे दुर्लक्ष करा

सध्या पेरणी करण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. तो चुकीचा आहे. राज्य शासनाकडून या काही सूचना येतात त्याचे पालन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. पेरणी करण्याची घाई करू नये. पावसाच्या अंदाजात 3 ते 5 दिवसात अक्युरसी असते. 3 ते 5 दिवसांच्या पुढचा कोणी अंदाज सांगत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे. कुणीही असे जर दावे करत असेल की 8-10 दिवसानंतर जास्त पाऊस पडणार आहे, तर त्याकडे दुर्लक्ष करून तीन ते पाच दिवसाचा जो अंदाज दिला जातो त्याकडे लक्ष द्यावे, असं आवाहन करतानाच मान्सून तळ कोकणातच रेंगाळला आहे. पुढे सरकण्यासाठी कोणतीही अनुकूल परिस्थिती अद्यापही नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us