पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, पुढील चार तास धोक्याचे, आयएमडीचा धडकी भरवणारा अंदाज
महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार पुढील काही तास अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, पुण्यासह काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, रविवारी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला, पुणे जिल्ह्याला पावसाचा मोठा तडाखा बसल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे, पुढील चार तास जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
पुणे जिल्ह्यासह रायगड, आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे, पुढील चार तास या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे पुढील चार ते पाच दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता असून, या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर दुसरीकडे कोकणातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा पावसाची हजेरी
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा दमदार पावसानं हजेरी लावली आहे, पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला, हवामान विभागाने पिंपरी चिंचवड शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. जवळपास एक दोन तास आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालवण्याची वेळ पिंपरी-चिंचवडकरांवर आली. नालेसफाईचं काम योग्य पद्धतीनं न झाल्यानं शहरातील बहुतांंश भागात पाणी साचलं आहे.
दरम्यान राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला. बारामतीमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, कालवा फुटल्यानं पाणी शेतात शिरलं यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दौंडमध्ये देखील मोठं नुकसान झालं आहे.
