राज्यात एकामागून एक भीषण अपघात, 24 तासांत 5 जिल्ह्यांमध्ये थरकाप उडवणाऱ्या घटना, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत अपघातांचे सत्र पाहायला मिळाले. चंद्रपुरात कार नदीत कोसळली, तुमसरमध्ये हिट अँड रनमध्ये तरुण ठार, तर वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात झाला आहे.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कुठे कार नदीत कोसळली, कुठे एसटी बस कोसळल्याने मोठा अपघात झाल्याची समोर आली आहे. तसेच एका ठिकाणी झालेल्या हिट अँड रनच्या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला होता. चंद्रपूर, वाशिम, भंडारा, पालघर आणि परभणी जिल्ह्यात झालेल्या या अपघातांमुळे राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चंद्रपुरात पुलावरून कार कोसळली, ५ जण गंभीर जखमी
चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई नदी पुलावर एक अत्यंत धक्कादायक अपघात घडला. चंद्रपूरकडून नागपूरच्या दिशेने अतिवेगाने जात असलेल्या एका कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलाचा लोखंडी कठडा तोडून थेट खाली नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात कारमधील ५ प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
खापा चौकात हिट अँड रन
तुमसर-रामटेक महामार्गावरील खापा येथे एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात भंडाऱ्यातील हिंगणा येथील हिमांशु पटले (२६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून आर्थिक मोबदल्याच्या मागणीसाठी रामटेक-गोंदिया महामार्ग रोखून धरला होता. रात्री १ वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनानंतर तुमसर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला.
शिवशाही बसचा अपघात
हिंगोली ते अकोला दरम्यान धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका शिवशाही बसला वाशिम जवळील तोंडगाव फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या कडेला खाली उतरली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी जखमींना वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
सिन्नर महामार्गावर डंपर उलटला; चौपदरीकरणाची मागणी
पालघर-सिन्नर महामार्गावरील गोवाडे गावाजवळ पालघरच्या दिशेने जाणारा एक डंपर अचानक रस्त्यावर उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. मनोर ते पालघर दरम्यान दोन दिवसांतील हा दुसरा अपघात असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा रस्ता अरुंद आणि धोकादायक वळणांचा असल्याने येथे सतत अपघात होत आहेत, त्यामुळे या महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा वाहतूक शाखेने क्रेनच्या मदतीने डंपर हटवून वाहतूक पूर्ववत केली.
गंगाखेडमध्ये कारचा टायर निखळल्याने अपघात
परभणीच्या गंगाखेड शहरातील परळी रोड परिसरात चालत्या कारचा टायर अचानक निखळल्याने भीषण अपघात झाला. टायर निघाल्यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याकडेला आदळली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
