
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अवघे तीन दिवसही झाले नाही तोच राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. सुनेत्रा पवार यांना तातडीने उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याची राष्ट्रवादीने सुरू केली आहे. तर शरद पवार गटाकडून वारंवार दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणावर भाष्य केलं जात आहे. तर अजितदादा गटाकडून विलिनीकरणाची चर्चा झालीच नसल्याचा दावा केला जात आहे. आज दुपारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेता म्हणून निवडलं जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. राज्यातील त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहे. पण त्यापूर्वीच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. त्यांच्या ट्विटमधून कुणाला निशाणा साधलाय, अशी चर्चा आता रंगली आहे.
रोहित पवार यांचं ट्विट काय?
बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या शेवटच्या वाक्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. रोहित यांचा हा टोमणा कुणाला आहे? असा सवाल केला जात आहे.
स्वर्गीय शब्द लावू नका
डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे… ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीये, असं सांगतानाच आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.!, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा…!
आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात मा. अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो… pic.twitter.com/HXQnY0VmLh— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 31, 2026
घडामोडींना वेग
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं. त्याचवेळी त्यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असल्याची आपल्याला माहिती नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने तातडीने पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही चर्चा झाली. त्यानंतर पार्थ यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधला. यावेळी सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर पार्थ हे गोविंदबागेतून गेले. सुनेत्रा पवार या मुंबईत असून विधानभवनात आमदारांच्या बैठकीसाठी आल्या आहेत