भावजय की आई, माजी आमदारापुढे मोठा पेच, महापौरपदासाठी कोणाची निवड होणार; बडी महापालिका पुन्हा चर्चेत!
मालेगाव महानगरपालिकेत महापौरपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. त्यामुळे इस्लाम पार्टीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. माजी आमदार आसिफ शेख यांच्यापुढे भावजई की आई यापैकी कोणाची निवड करावी, असा पेच निर्माण झाला आहे.

Malegaon Mayor 2026 : राज्यात एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक मोठ्या धामधुमीत पार पडली. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले होते तर 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. आता मुंबईसह, ठाणे, जळगाव अशा मोठ्या महापालिकांत महायुतीची सत्ता येणार आहे. लातूर, मालेगाव यासारख्या महापालिकांत मात्र भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेला हादरा देत अनुक्रमे काँग्रेस, इस्लाम पार्टीने सत्ता काबीज केली. दरम्यान, आता महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीमुळे अनेक नेत्यांचे महापौर होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेतही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. येथे माजी आमदार आसिफ शेख यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
मालेगावमध्ये नेमकं काय घडतंय?
मालेगाव महापालिकेची महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीत मालेगावचे महापौरपद सर्वाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचा हिरमोड झाला आहे. मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. या पक्षाला एकूण 35 जागा मिळाल्या आहेत. इस्लाम पार्टीचा मित्रपक्ष समाजवादी पार्टी या पक्षाने 5 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसचा 3 जागांवर विजय झाला आहे. या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचे ठरवले आहे. या तिन्ही पक्षांनी 43 हा सत्ता स्थापनेचा जादुई आकडा पार केला आहे.
भावजई की पत्नी, कोणाची निवड होणार?
मालेगावमध्ये या तिन्ही पक्षांची सत्ता येणार असल्याचे समोर आल्यानंतर इस्लाम पार्टीचाच महापौर होणार हेदेखील निश्चित झाले आहे. आरक्षणाची सोडत जाहीर होण्याआधी इस्लाम पार्टीचे प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांचे बंधू हाजी खालिद रशीद शेख हे महापौरपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र आता मालेगावचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने हाजी खालिद शेख यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी नसरीन हाजी खालिद शेख यांचे तसेच त्यांच्या आई माजी महापौर ताहेरा रशीद शेख यांची नावे चर्चेत आले आहे.
त्यामुळेच इस्लाम पार्टीचे अध्यक्ष आसिफ शेख यांच्यापुढे भावजई की आई यापैकी कोणाची निवड करावी, असा पेच निर्माण झाला आहे. मालेगाव महापालिके महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
