तुला नोकरी लावून देतो.., गिरीश महाजनांच्या नावाने 19 वर्षीय तरुणीला घातला गंडा
पोलिस भरतीच्या नावाखाली एका 19 वर्षीय युवतीची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण तरुणी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अनेकजणांना पोलिसात भरती होऊन जनतेची सेवा करायची आहे. अशातच आता पोलिस भरतीच्या नावाखाली एका 19 वर्षीय युवतीची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साडे चार लाख रुपयांची फसवणूक
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा येथे एका तरुणीची फसवणूक करण्यात आली आहे. मी मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या आहे. मी पोलीस दलात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून 19 वर्षीय युवतीची फसवणूक करण्यात आली आहे. या तरुणीकडून आतापर्यंत साडे चार लाख रुपये लाटले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नियुक्तीची बनावट ऑर्डर दाखवली
आरोपी अभिषेक प्रभाकर पाटील याने गिरीश महाजन यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार दिलीप बनकर हे माझ्या खूप जवळचे आहेत. त्यामुळे मी नोकरी देऊ शकतो असं आमिष निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या 19 वर्षीय युवतीला दाखवले होते. त्याने स्वाती व तिच्या आईला मुंबईत नेत, तिथे दादरला काही दिवस ठेवले. तिथे तिला नियुक्तीची बनावट ऑर्डर दाखवली. नंतर अॅकॅडमीत प्रवेश दिला व आठ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी स्वातीच्या आईने त्याला चार लाख रुपये दिले होते.
आरोपीवर कारवाईची मागणी
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वाती राजेंद्र चाबुकस्वार या 19 वर्षीय तरुणीने सायखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अभिषेक प्रभाकर पाटील याला अटक केली असून त्याला आता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशाप्रकारे नेत्याच्या नावाने फसवणूक केल्यास नेत्याचीही बदनामी होते. त्यामुळे भाजपचे नाशिक जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
