आम्ही संयम ठेवलाय, कारण… मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांच्या वकिलांना असं का म्हटलं?
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे आझाद मैदानावरील उपोषण सुरू असून, यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने आंदोलकांना तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर सध्या जरांगे पाटील हे विनापाण्याचे उपोषण करत आहेत. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत कोर्टाने आंदोलकांना तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. यावर उद्या, २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. तसेच कठोर निरीक्षणे नोंदवली.
तुम्ही दिलेल्या हमीपत्रांचे उल्लंघन करताय?
उच्च न्यायालयाने आंदोलनामुळे होणाऱ्या गैरसोयीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता, मुंबईकरांना होत असलेला त्रास आणि सर्वसामान्य लोकांच्या मूलभूत गरजांवर होणारा परिणाम यावर कोर्टाने चिंता व्यक्त केली. आम्ही संयम ठेवलाय, कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा आहे. पण तुम्ही स्वतः दिलेल्या हमीपत्रांचे उल्लंघन करताय ? हे काय सुरु आहे. हे आंदोलन शांततापूर्ण नसल्याचं निरीक्षण नोंदवत कोर्टाने सरकारला दिलेल्या हमीपत्राचं उल्लंघन झाल्याचंही सांगितलं. हे आंदोलनाचे विरोधात नसले तरी, नियमांचे पालन व्हावे आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली.
यावेळी आंदोलकांना कोर्टाने पावसाची शक्यतेबद्दलही विचारणा केली. पावसाची शक्यता असतानाही तुम्ही आलात, मग चिखलात बसायची तयारी नाही का? असा सवाल न्यायालयाने आंदोलकांना दिल्या गेलेल्या जागेबद्दल प्रश्न विचारला. आझाद मैदानावर तंबू का उभारले जात आहेत आणि रेल्वे स्टेशनचा आधार का घेतला जात आहे.
जरांगेचे वकील आहात की दुसऱ्या कोणाचे?
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच कोर्टात जोरदार वाद झाला. एका वकिलाने सदावर्ते यांनी नवीन याचिका दाखल करावी अशी विनंती केली. पण कोर्टाने त्यांना लगेच थांबवले. तुम्ही जरांगेचे वकील आहात की दुसऱ्या कोणाचे? असा थेट प्रश्न विचारत तुम्ही जर दुसऱ्याचे वकील असाल तर जरांगे यांच्या बाबतीत का बोलताय, अशी विचारणा केली.
उद्या पुन्हा सुनावणी होणार
या सर्व प्रकारात कोर्टाने स्पष्ट केले की, आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. उद्या शाळा, महाविद्यालये आणि लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ नये. तसेच मुंबईतील वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत गरजांवर कोणताही अडथळा येऊ नये, अशी अपेक्षाही कोर्टाने व्यक्त केली. यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार असून, सरकार कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
