मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे, ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे.

मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आपण रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आपण सरकारला दहा महिन्यांचा वेळ दिला, 29 मे रोजी दहा महिने पूर्ण होत आहेत, सरकारला अजून किती वेळ द्यायचा? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे, त्यामुळे आता कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाहीये, परंतु जर गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय होत असेल तर कठोर भूमिका घ्यावी लागेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाहनाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विखे पाटलांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर ते उद्या दुपारी बारा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत. इथे विखे पाटील यांची विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान त्यापूर्वी गुरुवारी दुपारी राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद देखील पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की मी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात आहे, आणि या सगळ्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सकारात्मक आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.