Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत – राऊतांचा गंभीर आरोप
मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने राज्यात तीव्र वळण घेतले आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटाने आंदोलकांना मदत केल्याचा आरोप केला आहे. फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसह जरांगेंशी चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. राजकीय नेत्यांच्या भूमिकांवरूनही राऊत यांनी टीका केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी लावून धरत मनोज जरांगे यांनी कालपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसले असून मुंबईतील आझाद मैदानात त्यांचं उपोषण सुरू आहे. हजारो मराठ आंदोलक, समर्थकही मुंबईत दाखल झाले असून आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही असाच पवित्रा सर्वांनी घेतला आहे. या मुद्यावरून सध्या राजकीय वातावरणही पेटलं असून आंदोलनात मध्यमार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी पुन्हा या मुद्यावरून भाष्य केलं असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरांगेंची भेट घ्यावी, जेणेकरून त्यातून काही मार्ग काढता येईल असं राऊत म्हणाले. फडणवीसांनी प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली पाहिजे असं राऊत म्हणाले. एवढंच नव्हे तर फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेंकडून आंदोलकांना मदत केली जात आहे, हायुतू असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
कालही राऊतांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या मुद्यावरून भाष्य केलं होतं. मराठा आंदोलनाचे नेते, जरांगे जिथे बसले होते, त्या मराठवाड्यात सरकारच्या वतीने अधिकारी गेले होते, पण तिथे जर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस गेले असते, त्यांच्याशी चर्चा केली असती तर हे वादळ मुंबईत आलंच नसतं. मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जायला हवं होतं,असं राऊत म्हणाले होते. तर आज त्यांनी पुन्हा मराठा आंदोलनावर भाष्य करताना शिंदेंवर आरोप केले.
काय म्हणाले संजय राऊत ?
मराठा आंदोलनावर मार्ग काढायचा असेल तर या मुद्यावर महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी, माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चा केली पाहिजे. अहंकार बाजूला ठेवून प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून, त्यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली पाहिजे. आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.
शिंदेंवर गंभीर आरोप
महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत, मिध्यांचा ( शिंदे गट) विषय वेगळा आहे. फडणवीसांना अडचणीत आणण्याशाठी शिंदे हे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करत आहेत असा आरोप राऊतांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत. आणि मिस्टर. अजित पवार हे तर चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाहीये. अशा परिस्थितीत राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
