मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना घेराव, बॉटल फेकल्या, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
ज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. बाहेर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण चालू आहे. या आंदोलनाला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाहेर निघताना मात्र सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे.
सुप्रिया सुळेंना घेरलं
मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे आझाद मैदानातून बाहेर पडत होत्या. यावेळी त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. तसेच एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे यावेळी काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या कारचा पाठलाग केला. तसेच सुळे यांच्या कारवर काही लोकांनी बॉटलही फेकल्या. एका आंदोलकाने तर शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले आहे, असाही आरोप केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस टीव्ही नाईन मराठीशी बोलताना म्हणाले की, असं करण योग्य नाही. कुठलेही नेते तिथे गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. घोषणाबाजी करणं बाटल्या फेकणं योग्य नाही. हुडदंगबाजी करुन काहीच मिळणार नाही. आम्ही मराठा समाजासाठी हिताचे निर्णय घेतले आहेत. मी आणि एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिले. मराठा समाजाचे लोक आरक्षणाचा लाभ घेत आहे असं फडणवीस म्हणाले आहे.
कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही
मराठा आरक्षण आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जरांगे पाटल्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आडमुठ्या भूमिकेने तोडगा निघत नाही, चर्चेतून निर्णय होतो. कायदेशीर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ लागेल. कोर्टाच्या निर्णयांचा अवमान करुन चालणार नाही. कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आरक्षण दिल्यास ते टिकणार नाही. यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
