Sharad Pawar : त्या दोन प्रश्नावर शरद पवार भडकले, म्हणाले, मला काय माहीत ?
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेणार असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये 12 तारखेला विलीनीकरण होणार होते, पण दुर्देवाने ते शक्य झाले नाही, असेही ते म्हणाले.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मृत्यूनंतर आज तीन दिवसानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार याची माहिती नसल्याचं सांगतानाच त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांचीही शरद पवार यांनी उत्तरे दिली. मात्र, दोन प्रश्नांवर शरद पवार भडकले. थोडेसे व्यथित झालेलेही दिसले. मात्र, 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा होणार होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्रीपदासाठी अचानक नाव पुढे आलं? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर पक्षाची जबाबदारी सांभाळणारे आता नाहीत. त्यामुळे कुणी तरी पुढे आले पाहिजे. पक्षातून कोणी तरी पुढे आले पाहिजे, म्हणून त्यांचं नाव आलं असेल, असं शरद पवार म्हणाले.
अन् पवार भडकले
अजितदादा गेल्याने दुखवटा आहे. दुखवटा झाल्यावर या गोष्टी करता आल्या असत्या. एवढी घाई कोण करतंय? असा सवाल विचारताच शरद पवार भडकले. मी नाही, असं त्यांनी संतप्त उत्तर दिलं. यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरही प्रतिक्रिया दिली. दोन्ही पक्षांनी एकत्र काम करण्याची तयारी सुरू झाली होती. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात चर्चाही सुरू होती. त्यानंतर 12 तारखेला पक्षाच्या एकत्रिकरणाचा निर्णय जाहीर केला जाणार होता. ही तारीख अजितनेच दिली होती, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
कोण सांगणार ?
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करतोय हे तुम्हाला सांगितलं तरी पाहिजे होतं ना? असा प्रश्न करताच कोण सांगणार? असा सवाल त्यांनी केला. दोन्ही पक्षात सुसंवाद घडवण्यासाठी चर्चा सुरू होती. सकारात्मक दिशेने ही चर्चा सुरू होती. तारीखही ठरली होती. पण दुर्देवाने या घटनेने त्याला धक्का बसला, असंही पवार म्हणाले.
पुन्हा भडकले
राष्ट्रवादीचं रिमोट हातात ठेवण्यासाठी भाजपने हे सर्व घडवून आणलंय का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यालाही पवार यांनी थेट उत्तर दिलं नाही. मला माहीत नाही. चर्चा तुमच्या मनात आहे. आमच्या नाही, असं पवार म्हणाले. मग शपथविधीची एवढी घाई कशासाठी? असा सवाल करताच पवारांनी उलटा संतप्त सवाल केला. तुम्ही मला का विचारता? असा सवालच पवारांनी केला. दोन्ही पक्ष एकत्र आल्याने ज्यांचं महत्त्व कमी होणार होतं, त्यांनी हे सर्व घडून आणलंय का? या प्रश्नावरही त्यांनी मला माहिती नाही. अशी माहिती असेल तर मला द्या, असं उत्तर पवारांनी दिलं.
