Maratha Reservation : छगन भुजबळांनी दाखवली जीआरमधील ती मोठी चूक, जरांगे पाटलांचं टेन्शन वाढणार, आरक्षणाबाबत मोठा दावा
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, सरकारने जीआर काढल्यानंतर आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत मोठा दावा केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलं, सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला, तसेच जरांगे पाटील यांच्या अन्य काही मागण्या देखील मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र आता सरकारच्या या जीआरला ओबीसी समाजामधून जोरदार विरोध होत आहे. ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, त्यांना स्वतंत्र्य आरक्षण द्या, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. सरकारने काढलेल्या जीआरच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
आज भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केला आहे. मराठा समाज मागास नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसीत टाकता येत नाही. जाणूनबुजून खोटे प्रमाणपत्र दिले जात आहेत, जरांगेंनी पात्र शब्द काढायला लावला, दुसऱ्या जीआरमधून शब्द काढला. जरांगे म्हणाले मी स्वत: जीआर करून घेतला आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी या जीआर संदर्भात मोठा दावा केला आहे. हा जीआर मंत्रिमंडळासमोर न ठेवता, हारकती व सूचना न मागवता, शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दूर्लक्ष करून हा जीआर काढण्यात आला आहे. सध्या स्थितीमध्ये ओबसीमध्ये साडतीनशे पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे, त्यामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते. या जीआरमध्ये मराठा समाज असा शब्द प्रयोग करण्यात आला आहे, प्रत्यक्षात मराठा समाज आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत, हे महाराष्ट्र शासनाने देखील मान्य केलं आहे. कुणबींना ओबीसीमधून आरक्षण तर मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण असं ठरवण्यात आल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे. दरम्यान आता भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
